मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार,सुप्रिया सुळे,जयंत पाटील,संजय राऊत यांच्यावर ठाण्यातील सभेत सडकून टीका केली.येत्या 3 मे पर्यंत म्हणजेच रमजान ईद पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर त्यापुढे मशिदीसमोर हनुमान चाळीसा लावणार म्हणजे लावणारच असा ईशारा राज यांनी दिला.
गुढीपाडव्याची सभा झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जे तारे तोडले त्यानंतर त्याचं उत्तर दिलं पाहिजे असं वाटलं. पण मला पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यायचं नव्हतं. मी पत्रकार परिषद घेतली असती, तर या पक्षांना बांधिल असलेल्या पत्रकारांनी विषय भरकटवला असता. म्हणून मी ठाण्यात सभा घेण्याचा निर्णय घेतला.”
मशिदींवरील भोंग्यांचा अख्ख्या देशाला त्रास होतोय. यात धार्मिक विषय कोठे आहे? तुम्हाला जो नमाज पढायचा आहे, अजान द्यायची आहे ते घरात करा. शहरांचे रस्ते, फूटपाथ कशाला अडवताय? प्रार्थना तुमची आहे, आम्हाला का ऐकवताय? हे भोंगे खाली उतरवा, आम्हाला त्रास देऊ नका हे सांगून तुम्हाला समजत नसेल, तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार.
महाराष्ट्र हा शिवरायांचा आहे. शरद पवार कोणत्याही सभेत छत्रपती शिवाजींचे नाव घेत नाही. ते काय शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेतात. शरद पवार हे नास्तिक आहेत. शिवरायांचे नाव घेतले तर मुस्लीम मते जातील, अशी भीती शरद पवारांना आहे. घराघरात शिवाजी महाराजांना पोहचवण्याचे काम बाबासाहेब पुरंदरेने केले आहे. बाबासाहेब पुरंदरे हे पवारांसाठी सॉफ्ट टार्गेट आहेत. शरद पवारांना इतिहास नाही, तर जात बघायची आहे.
अजित पवारांच्या घरी रेड पडली, पण सुप्रिया सुळेंच्या घरी नाही. एकाच घरात राहून रेड टाळणं सुप्रिया सुळेंनाा कसं जमलं? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. सुप्रियांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे असल्याची टीका राज ठाकरेंनी केली आहे.
मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज बेसूर असतो. त्याचा कानांना त्रास होतो त्यामुळे भोंगे उतरवले पाहिजे. आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही. त्यामुळे मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारचं. 3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा असा ईशारा ठाकरे यांनी दिला.