नवी दिल्ली – राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.तसेच शिवसेना खा संजय राऊत यांच्यावरील कारवाई बाबत देखील पवार यांनी मोदींकडे विषय काढला.ही माहिती स्वतः पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये आज संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जवळपास 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये याआधी गेल्या वर्षी 17 जुलै रोजी भेट झाली होती. त्यावेळी देखील विविध मुद्यांवर चर्चा झाली होती. सध्या महाराष्ट्रात सुरू महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणा यांच्यात संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने चर्चांना उधाण आले होते.
या बाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पवार म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राचे राज्यपाल नियमाला धरुन काम करत नाहीत. विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचाही प्रश्न त्यांनी प्रलंबित ठेवला आहे. ही गोष्ट आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानावर घातली. त्यावर पंतप्रधानांनी या मुद्द्यावर लक्ष देण्याचं आश्वासन दिलं.”
शरद पवार पुढे म्हणाले की, “मंगळवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली. संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत. हा मुद्दाही आपण नरेंद्र मोदींच्या निदर्शनास आणून दिला.”
ईडीने संजय राऊत आणि इतर नेत्यांवर कारवाई केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला धोका आहे का असं विचारल्यानंतर शरद पवार म्हणाले की, “राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे स्थिर आहे, हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल आणि पुढच्या निवडणुकीनंतर पुन्हा सत्तेत येणार.”