मुंबई – अगोदरच प्रचंड ऊन अन उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला लोडशेडिंग च्या मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एप्रिलच्या सुरवातीलाच राज्यातील वाढत असलेलं ऊन अन गर्मी अन त्यामुळे झपाट्याने घटत असलेला पाणीसाठा हे राज्यातील जनतेसमोर नवं संकट निर्माण करण्यास कारणीभूत ठरण्याची भीती आहे.कोयनेसह मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा कमी होत असल्याने वीज निर्मिती वर परिणाम होऊन अर्धा महाराष्ट्र अंधारात जाण्याची शक्यता आहे.
कोयना धरणाच्या पाण्यावर जी वीजनिर्मिती केली जाते ती कमी होण्याची शक्यता आहे.दोन महिन्यांसाठी आरक्षित पाण्यापैकी केवळ 11.51 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रचंड उन्हाळा आणि सर्वाधिक मागणीच्या काळात पाण्याअभावी पश्चिमेकडून वीज निर्मिती बंद पडण्याची भीती आहे. त्यामुळे निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला अंधाराला सामोरं जावे लागेल. याशिवाय सिंचनाचा प्रश्नही गंभीर होण्याच्या शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोयना जलविद्युत प्रकल्पांची एकूण 1960 मेगावॅट क्षमता आहे. मात्र, लवादाच्या कोट्यामुळे येथे वर्षभरात सरासरी 20 टक्के क्षमतेनेच वीज निर्मिती होते. कोयना धरणात पश्चिमेकडे वीज निर्मितीसाठी लवादाच्या निर्णयानुसार आरक्षित कोट्यानुसार 67.50 टीएमसी पाणी आरक्षित असते. पश्चिमेकडे दरमहा सरासरी साडेपाच टीएमसी पाणी वापरले जाते. पावसाळ्यात कमी आणि उन्हाळ्यात मागणीनुसार विजेसाठी जादा पाणी सोडण्यात येते. त्यामुळे आगामी दोन महिन्यांसाठी विजेसाठी आरक्षित शिल्लक अवघा 11.51 टीएमसी पाणीसाठा सध्या चिंतेचा विषय आहे.