मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मलिक यांना झोपायला बेड,चादर आणि बसायला खुर्ची देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.मलिक यांच्या कोठडीत वाढ झाल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा राजीनामा घेणार का याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत .
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना तब्बल साडेसात तासांच्या चौकशीअंती 23 फेब्रुवारीला अटक केली. मलिक यांना 7 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती. त्यांनंतर त्यांना सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी 1993 स्फोटातील आरोपीकडून कुर्ला भागात एक मालमत्ता खरेदी केली होती. कोट्यवधींची किंमत असलेली ही मालमत्ता नवाब मलिकांनी अवघ्या 30 लाखांत खरेदी केली होती. असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 9 नोव्हेंबर 2021 रोजी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केला होता. या जमीन खरेदीत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणी चौकशी केल्यानंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती.