मुंबई – गोव्यातील यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत या दोन नेत्यांच्या मेहनतीचे यश असल्याचे मत गोवा भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. गोव्यात पुन्हा एकदा भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले असून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.
गोव्यात भाजपला निर्भेळ यश मिळवून दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील नागरिकांचं अभिनंदन केले. तसेच या विजयाचे श्रेय कुणाचे हे सांगताना ते म्हणाले, ‘ भाजप नेता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोव्यातील यशाचे श्रेय जाते. मोदींनी देशात जो विश्वास तयार केलाय त्यामुळे गोव्यात ही मतं मिळाली आहेत. लोक म्हणत होते अँटी इन्कबन्सी फॅक्टरचा प्रभाव गोव्यात होईल आणि भाजपला जनता नकार देईल. मात्र तसे झाले नाही. मत विभागूनदेखील नाही तर लोकांनी दिलेल्या पॉझिटिव्ह व्होटवर आम्ही निवडून आलो आहोत. त्यानंतर गोव्यातील या यशाचे श्रेय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही दिले पाहिजे. गोव्यात डबल इंजिन सरकारने जे काम केलं आहे, त्याचाच हा विजय आहे.
उत्तर प्रदेश – भाजप 275,सपा 123 गोवा – भाजप 20,काँग्रेस 11 उत्तराखंड – भाजप 48,काँग्रेस 19 मणिपूर – भाजप 33 काँग्रेस 5 पंजाब – आप 91,काँग्रेस 19
गोव्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. लवकरच या राज्यात पक्षाच्या वतीने सत्तास्थापनेचा दावा केला जाईल. याविषयी प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ गोव्यात भाजपला स्पष्ट बहुमत असले तरीही अनेक अपक्ष आमच्याशी संपर्कात आहेत. आम्ही त्यांनाही सोबत घेणार आहोत. तसेच MGP अर्थात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षदेखील आमच्यासोबत असेल. अर्थात यासंबंधीचा निर्णय ते घेतील. मात्र आम्ही सर्वांना सोबत घेऊन सरकार स्थापन करणार आहोत. तसेच सत्ता स्थापनेचा दावा कधी करणार याचा निर्णय सेंट्रल पार्टी घेईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
गोवा विधानसभा निवडणुकीचे बहुतांश जागांवरील निकाल हाती आले आहेत. काही प्रमाणात मतमोजणी अजूनही सुरु असून सध्याच्या ट्रेंडनुसार, भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे चित्र आहे. दुपारपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, भाजप 20, काँग्रेस 11, आप- 02, अपक्ष- 3, मगोप- 2 जागांवर आघाडीवर आहे.