नवी दिल्ली- पाच राज्याचे निकाल हे विचार करायला भाग पाडणारे आहेत.मतदारांनी भाजपला स्वीकारलं असलं तरी भाजप विरोधात सर्वपक्षीय आघाडी करण्याबाबत विचार करण्याची हीच योग्य वेळ असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
पंजाबमधील शेतकऱ्यांचा राग मतमदानातून दिसला. त्यांनी भाजपाला हरवलं काँग्रेसला हरवलं आणि नव्या पक्षाच्या हातात सत्ता दिली. केजरीवालांच्या दिल्लीतील कामगिरीमुळे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा मोठा विजय झाला. लोकांच्या बोलण्यातून केजरीवालांच्या कामांबाबत उत्सुकता दिसत होती. पंजाबमधील निकाल हा भाजपाला अनुकूल नाही आणि काँग्रेससाठीही धक्कादायक आहे, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, गेल्या काही काळातील निवडणुकांचा विचार केला तर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल अशा राज्यांमध्ये राज्यांत भाजपेत्तर पक्षांना यश मिळालं आहे. राष्ट्रीय विषयांवर जनतेचं वेगळं मत दिसून येतं. मात्र आपण जनतेने दिलेल्या कौलाचा आदर केला पाहिजे. कारण तो लोकांचा निर्णय असतो, तो स्वीकारला पाहिजे. मात्र या निकालांमुळे विरोधकांनी नाऊमेद होता कामा नये. आता देशातील विरोधी पक्षांनी भाजपाविरोधात प्रभावशाली पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रम तयार करण्यासाठी एकत्र आले पाहिजे. विरोधकांच्या एकत्र येण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.