मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी च्या कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. बुधवारी सकाळी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर दुपारी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचे इकबाल कासकर याच्याशी संबंध असल्याच्या आरोपावरून ईडीने त्यांच्या घरी सकाळी छापा घातला होता.साडेसात तास चौकशी केल्यानंतर त्यांना दुपारी अटक करण्यात आली.
रुग्णालयात तपासणी पूर्ण केल्यानंतर त्यांना सायंकाळी न्यायालयासमोर हजर करण्यात आले.दोन तासापेक्षा अधिक काळ या विषयावर न्यायालयात दोन्ही बाजू मांडण्यात आल्या. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास न्यायालयाने मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.