नवी दिल्ली – यावर्षी अस्ट्रोलिया मध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत पहिला सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे.या स्पर्धेसाठी दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत.
या विश्वचषकाला १६ ऑक्टोबर रोजी पहिल्या फेरीने सुरुवात होईल. त्यानंतर २२ ऑक्टोबरपासून सुपर १२ फेरी खेळली जाणार आहे. ही संपूर्ण स्पर्धा १६ देशांच्या संघात होणार असून सात वेगवेगळ्या शहरात सामने होणार आहेत. १६ देशांपैकी १२ देश निश्चित झाले असून ४ देशांचे संघ पात्रता फेरीनंतर निश्चित होतील.
सलामीचे सामने
या विश्वचषकात १६ ऑक्टोबर रोजी पहिल्या फेरीतील पहिला सामना श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात पहिला सामना पार पडेल. याच दिवशी पात्रता फेरीतून पहिल्या फेरीत प्रवेश केलेल्या संघांमध्येही सामना होणार आहे. सुपर १२ फेरीला २२ ऑक्टोबरला सुरुवात होणार असून पहिलाच सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात पार पडेल. हे दोन्ही संघ २०२१ टी२० विश्वचषकात अंतिम सामन्यात आमने-सामने होते.
त्यानंतर लगेचच २३ ऑक्टोबर रविवारी भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघात सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्याने हे दोन्ही संघ या स्पर्धेतील आपल्या अभियानाला सुरुवात करणार आहेत. २०२१ टी२० विश्वचषकातही या दोन संघात सुपर १२ मध्ये लढत झाली होती. त्यावेळी पाकिस्तानने भारताला १० विकेट्सने पराभूत केले होते आणि भारतावर विश्वचषकात पहिल्यांदाच विजय मिळवण्याचा कारनामा केला होता. आता या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न भारत २३ ऑक्टोबरला करेल, तर पाकिस्तान गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही कामगिरी करण्याच्या हेतूने मैदानात उतरेल.
ऑस्ट्रेलियामध्ये २०२२ साली होणारे टी२० विश्वचषकाचे आठवे पर्व असणार आहे. या स्पर्धेत यजमान ऑस्ट्रेलिया गतविजेते म्हणून उतरतील. या स्पर्धेत एकूण ४५ सामने होणार आहेत. टी२० विश्वचषक २०२२ मधील सुपर १२ फेरीसाठी यजमान ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त आयसीसीच्या टी२० क्रमवारीनुसार न्यूझीलंड, अफगाणिस्तान, बांगलादेश, भारत, इंग्लंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे ८ संघ थेट पात्र ठरले आहेत.
तसेच पहिल्या फेरीसाठी श्रीलंका, वेस्ट इंडिज, नामिबिया आणि स्कॉटलंड खेळतील. अन्य ४ संघ २ पात्रता स्पर्धेतून पहिल्या फेरीसाठी पात्र ठरतील.या विश्वचषकात क्रमवारीत अव्वल ८ स्थानांवर असलेले संघ थेट सुपर १२ च्या फेरीत खेळतील. तर अन्य ८ संघांमध्ये पहिली फेरी पार पडेल. त्यातील ४ संघ (प्रत्येक गटातील अव्वल २ संघ) सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरतील. या फेरीत १२ संघांची २ गटात विभागणी केली आहे. म्हणजे प्रत्येक गटात ६ संघ असतील.
आयसीसीने जाहीर केलेल्या गटवारीनुसार सुपर १२ फेरीसाठी इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांचा ‘गट एक’ मध्ये समावेश आहे, तर भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगदेश ‘गट दोन’ मध्ये आहेत. या दोन्ही गटात पहिल्या फेरीतून पात्र ठरणारे प्रत्येकी २ संघ सामील होतील.
सुपर १२ च्या फेरीनंतर प्रत्येक गटातील अव्वल २ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर उपांत्य फेरीतील विजेते संघ अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी एकमेकांसमोर येतील.