बीड – राज्यातील टीईटी घोटाळा उघडकीस आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने 2013 पासून टीईटी दिलेल्या अन नोकरीस लागलेल्या सर्व शिक्षकांच्या प्रमानपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते,त्यानुसार बीड जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील 121 शिक्षकांचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहेत.त्यामुळे या शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
आरोग्य भरती घोटाळा अन पेपरफुटी समोर आल्यानंतर तपास करणाऱ्या यंत्रणेला टीईटी परीक्षेत देखील घोटाळा झाल्याचे दिसून आले.या प्रकरणी पोलिसांनी शिक्षण विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक केली तसेच इतरही अनेक अधिकारी या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले.
टीईटी परीक्षेत मोठ्या प्रमाणात गडबड झाल्याचे समोर आल्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने 2013 पासून टीईटी दिलेल्या सर्व उमेदवारांच्या प्रमानपत्रांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषद प्रशासनाला याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
बीड जिल्ह्यातील प्राथमिक विभागातील 88 आणि माध्यमिक विभागातील 33 शिक्षकांच्या जे 2013 पासून नोकरीस लागलेले आहेत त्यांच्या प्रमानपत्रांची तपासणी करण्यासाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत.या शिक्षकांनी ज्यावेळी परीक्षा दिली त्यावेळी नेमकी काय परिस्थिती होती याची देखील तपासणी केली जाणार आहे.ज्यांच्या प्रमानपत्रांची तपासणी होणार आहे त्या शिक्षकांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.