बीड- राज्यात नगर पंचायत निवडणूक जाहीर झाली अन राजकीय पक्ष अन कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले.बीड जिल्ह्यात देखील पाच नगर पंचायत मध्ये निवडणूक होत आहे,पण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हे दोघेही गावातील नगर पंचायत निवडणुकीत बेजार झाल्याचे चित्र आहे .त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यात तर सोडा पण स्वतःच्या जिल्ह्यातील इतर नगर पंचायत मध्ये सुद्धा प्रचाराला जायला त्यांना वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे.
बीड जिल्हा हा राजकीय दृष्ट्या अतिसंवेदनशील आहे,सगळ्या पक्षाचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष ते शहराध्यक्ष बीडमध्ये आहेत.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख हे आहेत.सोनवणे हे केज तालुक्यातील आहेत तर शेख हे शिरूर तालुक्यातील आहेत.
या दोन शहरासह आष्टी पाटोदा आणि वडवणी शहरात देखील नगर पंचायत ची निवडणूक होत आहे.भाजपने वडवणी, आष्टी,पाटोदा शिरूर मध्ये प्रचारात आघाडी घेतली आहे तर केज मध्ये काँग्रेस आघाडीवर आहे.मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अजून शांतता असल्याचे चित्र आहे.
महेबूब शेख ज्या शिरूर शहरातून येतात त्यांना आपल्या गावातच निवडणूक जड जात आहे,स्वतःच्या गावात कुठल्याही सोयी सुविधा किंवा विकास करण्यापेक्षा शेख हे मुंबईत मंत्र्यांच्या मागेपुढे करण्यात अन नेतेगिरी करण्यात गुंग असल्याने गावाचा संपर्क राहिलेलाच नाही,त्यामुळे भाजपने जी फिल्डिंग लावली आहे त्यामध्ये शेख हैराण झाले आहेत.गावातून बाहेर पडण्यासाठी वेळ मिळत नसल्याने त्यांना इतर गावात प्रचाराला जायला वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे.
तर दुसरीकडे केज या तालुक्यातून येणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या समोर महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस ने आव्हान उभे केले आहे.सोनवणे हे देखील शहराच्या विकासापेक्षा स्वतःचा विकास करण्यात जास्त गुंग असल्याने केज शहर वासीयांसमोर हात जोडता जोडता त्यांचे नाकीनऊ येत आहेत.त्यामुळे वडवणी, आष्टी,पाटोदा,शिरूर या नगर पंचायत प्रचारात त्यांना वेळ देता येत नसल्याचे चित्र आहे.