औरंगाबाद – माणूस कितीही मोठ्या पदावर असला तरी त्याने त्याचा मूळ स्वभाव अन व्यवसाय विसरू नये अस म्हणतात,याचा प्रत्यय दिल्ली येथे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्याबाबत आला.कराड हे विमानाने दिल्लीकडे निघाले असताना विमानात एका सहप्रवाशाला अचानक त्रास होऊ लागल्याने कराड यांनी तातडीने त्याच्यावर उपचार करून त्याचे प्राण वाचवले.त्यांच्या या कृतीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड हे काल इंडिगो विमानाने दिल्लीहून-मुंबई मार्गे औरंगाबादला येण्यासाठी निघाले होते. दिल्ली विमानतळावरून विमानाने टेकऑफ केले आणि अचानक एका प्रवाशाचा रक्तदाब वाढला आणि तो बेशुद्ध होऊन सीटवरच कोसळला. त्यामुळे विमानात एकच गोंधळ उडाला. तो गोंधळ पाहून डाॅ. भागवत कराड आपल्या सीटवरून उठले आणि बेशुद्ध पडलेल्या प्रवाशाच्या दिशेने गेले.
आपण डाॅक्टर असल्याचे त्यांनी सांगितले आणि बेशुद्ध झालेल्या प्रवाशाची नाडी तपासली. रक्तदाब वाढल्याने या प्रवाशाला चक्कर आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने प्रथोमचार म्हणून सदर प्रवाशाला काही औषधी देण्यास सांगितले, त्यानंतर तो प्रवासी शुद्धीवर आला. डाॅ.भागवत कराड यांनी योग्यवेळी प्रवाशावर उपचार दिल्याने पुढील अनर्थ टळला, त्यामुळे प्रवाशांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला.
दरम्यान, या प्रकाराची माहिती सोशल देतांना डाॅ. कराड म्हणाले, काल प्रवासा दरम्यान इंडिगो फ्लाइटमध्ये 12 A सीट वर बसलेल्या एका प्रवाशाला अचानक गंभीर आरोग्य समस्या उद्भवली व तो कोसळून पडला. मी समोरच्या सीट वर होतो, विमानात अचानक कुजबुज सुरु झाली आणि मला कळाले. एका क्षणाचा देखील विलंब न करता, कुठलाही मिनिस्ट्री प्रोटोकॉल विचारात न घेता मी एक डॉक्टर म्हणून त्याची ताबडतोड सुश्रुषा केली.