पुणे – जाणता राजा च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचवणारे,गड किल्ले याची खडा न खडा माहिती असणारे शिवभक्त बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले.गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते.महाराष्ट्र भूषण आणि पदमभूषण या पुरस्कारानी त्यांना गौरविण्यात आले होते.
बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे होते. त्यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी झाला. त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी, आदराने त्यांना बाबासाहेब पुरंदरे असे म्हटले जाऊ लागले. जवळपास सात दशके त्यांनी इतिहास संशोधनाचे कार्य केले. पहिल्यांदा ते 1941 मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात सहभागी झाले होते. इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले होते. पुणे विद्यापीठाच्या ‘मराठा इतिहासाची शकावली- सन 1740 ते 1764 ‘ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते.
महाराष्ट्र सरकारने त्यांना सन 2015 मध्ये राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन गौरव केला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला होता. इतिहास संशोधनात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रावर देश-विदेशात सुमारे 12 हजारांपेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत.
बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन केले. त्याशिवाय, ललित कादंबरी लेखन, नाट्यलेखनही केले. ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन केले. ‘सावित्री’, ‘जाळत्या ठिणग्या’, ‘मुजऱ्याचे मानकरी’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘महाराज’, ‘शेलारखिंड’, ‘पुरंदऱ्यांचा सरकारवाडा’, ‘शनवारवाड्यातील शमादान’, ‘शिलंगणाचं सोनं’, ‘पुरंदरच्या बुरुजावरून’, ‘कलावंतिणीचा सज्जा’, ‘महाराजांची राजचिन्हे’, ‘पुरंदऱ्यांची नौबत’ आदी साहित्य प्रकाशित झाले आहे. राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या 16 आवृत्ती प्रकाशित झाल्या असून 5 लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत.