बीड – मराठवाड्यासह ज्या ज्या भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला त्यांना हेक्टरी दहा हजाराची मिळणारी मदत देताना राज्य शासनाने खुट्टी मारली आहे.पंचनामे झाल्याशिवाय मदत देऊ नये असा आदेश शासनाने काढल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे .
बीड जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाले.लाखो हेक्टर जमीन खरडून गेली.अनेक मंत्री,अधिकारी यांनी पाहणी दौरे केले,त्यानंतर पंचनामे न करता सरसकट मदतीची आश्वासने देण्यात आली .
राज्य मंत्रिमंडळाच्या आठवडा भरापूर्वी झालेल्या बैठकीत जिरायत साठी हेक्टरी दहा हजार,बागायत साठी हेक्टरी पंधरा हजार आणि बहुवार्षिक पिकाच्या नुकसानी पोटी हेक्टरी 25 हजार मदतीची घोषणा केली.ही मदत केवळ दोन हेक्टर पर्यंत देण्याचा निर्णय शासनाने घेतला.
दरम्यान शासनाने आठ दिवसानंतर जो जी आर काढला आहे त्यात अगोदर पंचनामे करा आणि मगच पात्र लाभार्थ्यांना मदत वाटप करा अस म्हटलं आहे.जिथं सगळंच धुवून गेलं,हातात काहीच शिल्लक राहिला नाही,शेत सुद्धा दिसत नाही तिथं पंचनामे काय करणार असा सवाल शेतकरी विचारत आहेत .