नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वाढत्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे.येणाऱ्या काळात काही ठराविक धर्मियांची वाढती लोकसंख्या हा काही भागात उपद्रव ठरू शकते,त्यामुळे सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याबाबत गांभीर्याने विचार करावा असे मत मांडले.देशातील बांगलादेशी घुसखोरी वाढली आहे त्याला आला घालण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत असेही भागवत म्हणाले .
नागपूर येथे विजयादशमी निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते .केंद्र सरकारने लोकसंख्या धोरणावर पुनर्विचार करत लोकसंख्या नियंत्रण कायदा आणायला हवा. धार्मिक आधारावर सुरू असलेल्या असमान प्रजनन दराचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर देशाची संसाधन क्षमता, भविष्यातील आवश्यकता आणि लोकसंख्या असंतुलन पाहता सर्वांसाठी लोकसंख्या कायदा लागू करावा,’ अशी सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
बांगलादेशी घुसखोरी वाढली आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) आवश्यकता आहे. संघाने याबाबत रांची येथे २०१५ मध्ये झालेल्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीत प्रस्ताव पारित केला आहे. काही विद्वानांनीदेखील लोकसंख्या नियंत्रण कायद्याचे समर्थन केले आहे. केंद्राने एनआरसी अंतर्गत घुसखोरांना नागरिकता आणि जमीन खरेदीच्या अधिकारापासून वंचित करायला हवे.’ देशांतर्गत सुरक्षेबाबत बोलताना भागवत म्हणाले,’सागरी टापूंसह सर्व सीमा अधिक मजबूत करायला हव्यात. कलम ३७० रद्द केल्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. मात्र, तेथील नागरिकांमध्ये ते भारताचे अंग आहेत ही भावना निर्माण करण्याची गरज आहे.