मुंबई: मनसुख हिरेन यांच्या हत्येवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अतिशय आक्रमक पवित्रा घेतला.फडणवीस यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी राज्य सरकार विरोधी पक्षाला धमकावत असल्याचा आरोप त्यांनी केला .सचिन वाझे यांना निलंबित करून तात्काळ अटक करा अशी मागणी त्यांनी केली तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाची माहिती देताना दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची एसआयटी चौकशी करणार असल्याची घोषणा केली.सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात या मुद्यावरून चांगलीच खडाजंगी झाली .अखेर कामकाज तहकूब करण्यात आले .
मोहन डेलकर पाचवेळा दादरा नगर हवेलीचे खासदार राहिले. त्यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केल्या. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांचं नाव आहे. मी मुंबईत आत्महत्या करत आहे. कारण मला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, असं डेलकर यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी सभागृहाला दिली.
अनिल देशमुख यांनी डेलकर प्रकरणाची माहिती देत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन प्रकरण उपस्थित केलं. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याविरोधात इतके पुरावे असताना त्यांना का पाठिशी घातलं जातंय? सरकार त्यांचा वाचवण्याचा प्रयत्न का करतंय?, असे प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले. सचिन वाझे यांचं निलंबन झालं असताना त्यांनी एका पक्षात प्रवेश केला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांचं निलंबन मागे घेण्यात आलं, असं म्हणत फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला लक्ष्य केलं.