मुंबई – महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021 राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. सुरूवातीला अजित पवार यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर अर्थसंकल्पाचं वाचन सुरू केलं. यावेळी राज्य सरकार कडून आरोग्य विभागासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे.
कोरोनामुळे आरोग्य सेवा सुधारीत करण्याची गरज आहे अस अजित पवार म्हणाले, यासाठी सरकारकडून आरोग्य विभागासाठी ७ हजार २०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अजित पवार यांनी विधानसभेत दिली. सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, सातारा येथे वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येतील.
मागील वर्षी ३१ लाख २३ हजार शेतकऱ्यांना १९ हजार कोटी कर्ज थेट वर्ग केले गेले. शेतकऱ्यांना सुलभरित्या कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले. यंदा ४२ हजार कोटींचे पीक कर्जाचे वाटप झालेले आहे.शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने मिळणार आहे. कर्ज घेऊन वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी १,५०० कोटींचा महावितरणला निधी देण्याची घोषणा पवारांनी केली आहे.
एपीएमसीच्या (बाजार समित्या) बळकटीकरणासाठी २ हजार कोटी आणि विकेल ते पिकेल योजनेला २१०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहेकृषी क्षेत्रानेच अर्थव्यवस्थेला सावरले. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहेत.कृषी क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून राज्यातील ४ कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी २०० कोटी दरमहा देण्यात येतील.