बीड- बीड जिल्हा परिषदमधील लेखा विभागातील वरिष्ठ सहाय्यकाने मेडिकलचे बोगस बील सादर केले होते. याचा अहवाल संशयास्पद वाटल्याने सबंधित रुग्णालयाकडे चौकशी केली असता ते बोगस असल्याचे स्पष्ट झाले .यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी संकल्प कुलकर्णी यांना निलंबीत केले.कुलकर्णी यांच्यावर कारवाई करण्यासाठी जी तत्परता सीईओ नि दाखवली ती जल जीवन मिशन मधील महाघोटाळ्याचा मास्टर माईंड शिवाजी चव्हाण बाबत का दाखवली गेली नाही असा सवाल उपस्थित होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्हा परिषदेच्या लेखा विभागात संकल्प कुलकर्णी हे वरिष्ठ सहाय्यक लेखा म्हणून कार्यरत आहेत. कुलकर्णी यांनी काही दिवसांपुर्वी शास्वत हॉस्पिटल पुणेचे मेडीकल बील सादर केले होते. सदरील बील संशयास्पद वाटल्याने जिल्हा परिषदेने हा प्रस्ताव पडताळणी करिता पाठवला. दरम्यान पुणे येथील शास्वत हॉस्पिटलकडे चौकशी केली असता संबंधित बील हे संकल्प कुलकर्णी यांचे नव्हे तर त्यांच्या भावाचे असल्याचे स्पष्ट झाले. हे बील 1 लाख 10 हजार रूपयांचे असल्याचे समजते. यात संकल्प कुलकर्णी हे दोषी आढळल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत पवार यांनी संकल्प कुलकर्णी यांना तडकाफडकी निलंबीत केले. इतर विभागातील आणखी तिघांना वेगवेगळ्या कारणांसाठी निलंबीत केल्याचे देखील प्राथमिक माहिती आहे.
संकल्प कुलकर्णी यांनी जो खोटारडेपणा केला त्याबद्दल त्यांना शिक्षा होणे आवश्यकच आहे,मात्र त्याचसोबत जल जीवन मिशन मध्ये स्वतःचा मुलगा,मुलगी,पुतण्या आणि मर्जीतल्या गुत्तेदार मंडळींना कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळवुन देणाऱ्या शिवाजी चव्हाण यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही.जल जीवन मिशन च्या महाघोटाळ्याचा मास्टर माईंड हा शिवाजी चव्हाण आहे हे सर्वांना माहीत आहे,मात्र सीईओ पवार यांनी त्यांची बदली करून त्यांना अभय दिल्याची चर्चा आहे.त्यामुळे शिवाजी चव्हाण यांना नोकरीतून बडतर्फ करण्याची मागणी होत आहे.