गेवराई । वार्ताहर
पैठण येथील नाथ सागर धरणातून शनिवार रोजी 1 लाख 13 हजार क्यूसेस पाणी नदीपात्रात सोडल्याने गेवराई तालुक्यातील पंचाळेश्वर येथील तीर्थक्षेत्र भगवान दत्तात्रयांचे आत्मतीर्थ पाण्यात बुडाले आसून तीर्थक्षेत्र राक्षसभुवन येथील शनी मंदिर पाण्यात बुडाली असल्याने भाविकांसाठी येथील दर्शन बंद करण्यात आले आहे. त्या मुळे गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने तहसीलदार सचिन खाडे यांनी केले आहे.
पैठण नाथसागर जलाशयाची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून जायकवाडी धरण हे जवळपास 100 टक्के भरले असल्याने शनिवारी धरणाचे 10 ते 27, असे एकूण 18 दरवाज्यातुन 1लाख 13 हजार क्यूसेकने विसर्ग वाढवण्यात आल्याने असून गोदावरी दुथडी वाहत आहे. दरम्यान हे पाणी आज शनिवार रोजी गेवराई तालुक्यातून जाणा-या गोदावरी नदी पाञात दाखल झाले असून पंचाळेश्वर येथील सुप्रसिद्ध श्री.दत्त भोजन स्थान मंदिर हे पाण्याखाली गेले आहे. तर राक्षसभुवन येथील शनिमंदीर ही पाण्यात गेले आहे. तर नाथसागरात पाण्याची आवक सुरूच असल्याने गोदापात्रात पाण्याचा विसर्ग आणखी वाढू शकतो असे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे. गोदावरीत पाण्याचा विसर्ग होताच गोदाकाठावरील नागरिकांना दवंडीद्वारे सतर्कतेचा इशारा गेवराई तहसील प्रशासनाकडून देण्यात आला असून तहसीलदार सचिन खाडे यांनी अनेक गावांना भेटी देऊन तेथील सरपंच, पोलिस पाटील तसेच महसूल अधिकारी, कर्मचार्यांना खबरदारीच्या सुचना दिल्या आहेत. दरम्यान पांचाळेश्वर येथील दत्त भोजन स्थान मंदिरासह नदी पाञात असलेली छोटी मंदिरे पूर्ण पाण्याखाली गेली आसून राक्षसभुवन येथील शनी मंदिर पाण्याखाली गेले आहे.
चार जिल्ह्यांना धोक्याचा इशारा
धरणाच्या आपत्कालीन दरवाजासह सर्व 27 दरवाजे 4 फूटाने वर उचलून धरणातून होणारा विसर्ग 1 लाख 13 हजार 184 क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात आला. आवक लक्षात घेता विसर्गात दिड लाखापर्यंत वाढ होऊ शकते अशी शक्यता वर्तवून औरंगाबाद, जालना, परभणी व नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना जायकवाडी प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाथसागरातून पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे गोदाकाठावरील आपापल्या गावांत दवंडीद्वारे गोदावरी नदीकाठच्या नागरीकांनी,सर्तक राहाण्याचे आदेश देऊन कोणतीही जीवित, वित्तहाणी होणार नाही याची वेळोवेळी खबरदारी घेतली जात आसून नागरिकांनी सतर्क राहून वेळोवेळी प्रशासनाला माहिती द्यावी.
– सचिन खाडे
तहसीलदार, गेवराई