बीड- जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन योजनेतील नवेनवे घोटाळे आता उघडकीस येऊ लागले आहेत.ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील टेंडर क्लार्क शिवाजी चव्हाण यांचा मुलगा निखिल चव्हाण याच्यासह चार जण याच कार्यालयात कंत्राटी नोकरीस असताना त्यांनीच सर्व्हेक्षण केले अन त्यांनीच गुत्तेदार म्हणून टेंडर भरून स्वतःचे अन अधिकाऱ्यांचे उखळ पांढरे केल्याचा प्रकार समोर आला आहे.
जल जीवन मिशन या योजनेत बीड जिल्ह्यात सीईओ,कार्यकारी अभियंता आणि प्रकल्प संचालक यांनी वाट लावून टाकली आहे.मेरी मर्जी,मै चाहे ए करू,मै चाहे वो करू,मेरी मर्जी या पद्धतीने अधिकारी काम करू लागले आहेत.आम्हाला 2024 अखेर काम पूर्ण करायचे आहे या नावाखाली हे अधिकारी आपल्या मर्जीतल्या अन सगळं सांभाळणाऱ्या गुत्तेदारांना दहा दहा वीस वीस कामांचे वाटप करीत आहेत.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील टेंडर क्लार्क शिवाजी चव्हाण यांच्या मुलासह मुलगी आणि पुतण्याला मिळून 40 कोटींची कामे असल्याची बातमी न्यूज अँड व्युज ने दिल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. ग्रामीण पाणी पुरवठा म्हणजे आपली जहागिरी असल्यासारखं हे अधिकारी वागू लागले होते.
याबाबत अधिक माहिती घेतली असता ती धक्कादायक आहे.शिवाजी चव्हाण यांचा मुलगा निखिल चव्हाण ,संतोष पडुळे,जालिंदर डावकर आणि योगेश चव्हाण हे चौघेही याच कार्यालयात मार्च 2022 पर्यंत अभियांत्रिकी सल्लागार म्हणून कार्यरत होते.यासाठी या चौघांनी लाखो रुपये मानधन शासनाकडून घेतले आहे
या अभियांत्रिकी सल्लागारांनी टेंडर,इस्टिमेट,सर्व्हे,जियो टॅगिंग अस सगळं काम केलं.म्हणजेच यांनी सगळं शिजवून ठेवलं अन नंतर स्वतःच्या पत्रावळी वर वाढून घेतलं.अन वाढपी कोण होते तर स्वतः सीईओ पवार,कार्यकारी अभियंता डाकोरे आणि काकडे.
स्वतःच सर्व्हे करायचा अन स्वतःच टेंडर भरायचे नंतर स्वतःच काम घ्यायचे असा उद्योग या लोकांनी केला आहे.शासकीय कार्यालयात नोकरी करताना गुत्तेदारी करता येत नाही हे माहीत असताना देखील या चार जणांनी मिळून जवळपास 50 कोटींची कामे पदरात पाडून घेतली आहेत.