परळी –मराठवाड्यात गोगलगायी च्या प्रादुर्भावणे सर्वाधिक नुकसान झालेल्या बीड जिल्ह्याला सरकारी मदतीमधून एक छदाम ही मिळालेला नाही.मराठवाड्यातील बीड वगळता सात जिल्ह्यासाठी एक हजार कोटींची मदत प्राप्त झाली आहे मात्र यातून बीड जिल्ह्याला वगळण्यात आल्याने माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे.
राज्य सरकारने चक्रीवादळ, अतिवृष्टी, पूर, यासारख्या विविध नैसर्गीक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना अंतरिम दिलासा देण्यासाठी 3 हजार 500 कोटी रुपयांची मदत घोषित करून जिल्हा निहाय वितरित करण्याचा शासन निर्णय जारी केल्यानंतर त्या शासन निर्णयामध्ये कोणत्याही निकषात बीड जिल्ह्यासाठी एक फुटकी कवडी सुद्धा मदत देण्यात आलेली नाही.जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
मागील दोन महिन्यात सोयाबीन सह विविध पिकांना उगवल्यानंतर गोगलगायीनी खाऊन टाकले, शेतकऱ्यांना तीन-चार वेळा पेरण्या कराव्या लागल्या, त्यात एकरी हजारो रुपये वाया गेले. मागील तीन महिन्यात बीड जिल्ह्यात सुमारे 100 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, मात्र राज्य सरकारला हजारो हेक्टर शेतामध्ये वाटोळे केलेल्या गोगलगायी दिसल्या नाहीत व त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या व्यथाही दिसल्या नाहीत, हे दुर्दैव असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
मागील वर्षी राज्यात अतिवृष्टी झाली त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने 10 हजार कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना मदत दिली होती. यामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मराठवाड्यात सर्वाधिक 745 कोटी रुपयांची मदत तत्कालीन राज्य सरकारने केली होती.
मात्र यावर्षी राज्यात सत्तांतर झाल्यानन्तर मात्र बीड जिल्ह्यासोबत दुजाभाव झाला आहे का? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला असून, त्यांनी गोगलगायीनी केलेले नुकसान सरकारच्या निकषात बसत नसल्यास निकषांच्या बाहेर जाऊन विशेष मदत करण्याची राज्य सरकारकडे याआधीही विनंती केली होती.
त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात देखील धनंजय मुंडे यांच्या समवेत विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांनीही बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा व मदतीची मागणी सरकारपुढे मांडली होती. तेव्हा राज्य सरकारच्या वतीने या नुकसानीचे स्वतंत्र समितीमार्फत अभ्यासपूर्ण अहवाल मागवून निर्णय घेण्याबाबत सरकारने विधानसभेत निवेदन केले होते; मात्र शेतकऱ्यांचे नुकसान झालेले स्पष्ट आहे, गोगलगायीनी खाल्लेल्या बहुतांश पिकांचे पंचनामे देखील झालेत, मग थेट मदत द्यायची सोडून, अभ्यास, समिती हा फार्स कशासाठी, असा सवालही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
राज्य सरकारने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांप्रती अनास्था दाखवल्याने धनंजय मुंडे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून मागील दोन महिन्यात बीड जिल्ह्यातील सुमारे 12 ते 15 हजार हेक्टर शेतातील सोयाबीनचे गोगलगायीनी 100% नुकसान केले होते. याबाबत विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांच्यासह धनंजय मुंडे यांनी काही ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी देखील केली होती.
दरम्यान या हजारो हेक्टरवरील शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडणे योग्य नसून, समिती, अभ्यास या जंजाळातून बाहेर येत, नुकत्याच जाहीर केलेल्या मदतीच्या निर्णयाचा फेरविचार करत गोगलगायीनी नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना देखील तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी यानिमित्ताने धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा केली आहे.