बीड- जिल्हाधिकारी कार्यालयातील कोषागार कार्यालयाकडून अडवणूक होत असल्याने जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची तब्बल 12 कोटी रुपयांची बिले अडकली आहेत.त्यामुळे कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.कोषागार कार्यालयातील जिरे नामक झारीतील शुक्राचार्य मुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मात्र फरफट होत आहे.
शासकीय कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातून ठराविक रक्कम भविष्य निर्वाह निधी साठी आरक्षित केली जाते.ही रक्कम कर्मचाऱ्यांना मुलांचे लग्नकार्य,वैद्यकीय कारण किंवा इतर कारणासाठी वापरता येते.
बीड जिल्हा परिषदेच्या तब्बल 500 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन चार महिन्यापासून भविष्य निर्वाह निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी कार्यालयाकडे अर्ज केले.त्याची बिले तयार करून जिल्हा कोषागार कार्यालयात पाठविण्यात आले.
मात्र गेल्या चार महिन्यात जिल्हा परिषद कडून जेवढी जीपीएफ ची बिले दाखल झाली ती तीन ते चार वेळेस परत पाठविण्यात आली.कोषागार कार्यालयातील जिरे नामक अकाऊंट ऑफिसर यामध्ये काही ना काही त्रुटी काढतात अन बिल परत पाठवतात.त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत.कोषागार कार्यालयाच्या या अडवणुकी विरुद्ध कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या जीपीएफ साठी जर अडवणूक केली जात असेल तर सामान्य माणसाचे काम कस होत असेल अशी चर्चा होत आहे.