बीड – तब्बल पंधरा दिवसापेक्षा जास्त काळापासून पावसाने दडी मारल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत.मराठवाड्यात जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे बळीराजा हैराण झाला होता तर ऑगस्ट मध्ये पावसाने ओढ दिल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.
मराठवाड्यात जुलैमध्ये चांगला झाला. ४८ लाख १६ हजार ९६७ हेक्टरपैकी ४७ लाख ६ हजार १०२ हेक्टर म्हणजेच ९७.७० टक्क्यांवर प्रत्यक्ष पेरणी झाली. पण ऑगस्टमध्ये मान्सूनच्या पावसाने दडी मारल्याने १२१ टक्के पाऊस पडूनही चिंता वाढली आहे. फुलोऱ्यात असलेली सोयाबीन, मूग, उडीद पिके जळू लागली आहेत. फुले, कळ्या कोमेजून चालल्या आहेत. आठ दिवसांत पाऊस आला नाही तर नुकसानीची शक्यता आहे.
सध्या सर्वच पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. जेथे लवकरच पेरणी झाली तेथे शेंगा लगडल्या आहेत. पण गेल्या ११ दिवसांपासून पावसाने ओढ दिली. त्यामुळे फुलोऱ्याची गळ होत आहे. शेंगा लगडल्या पण त्यात दाणे भरले नाहीत. कपाशीला पाते लागले पण त्याचे बोंड तयार होण्यासाठी पाणी कमी पडत आहे. अशीच स्थिती सर्व पिकांची असून याचा परिणाम थेट उत्पादनावर होईल.
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ९१ टक्क्यांपेक्षा अधिक पेरण्या झाल्या. जुलैमध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील पिकांना फटका बसला. आता ऑगस्टमध्ये पावसाच्या खंडामुळे पुन्हा पिके धोक्यात आली आहेत. जिल्ह्यात खरिपाच्या हंगामात, विशेषतः सोयाबीन, कापूस यांचे उत्पादन घेतले जाते. अतिवृष्टीनंतर व पावसाच्या खंडामुळे वातावरणातील बदलामुळे सोयाबीनवर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, खोडमाशी, चक्री भुंगे यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.