बीड- राज्यातील बांधकाम कामगार आणि इतर मजुरांना दिले जाणारे मध्यान्ह भोजन अतिशय निकृष्ट ,बेचव असल्याचे उघड झाले आहे.शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी या प्रकरणी भांडाफोड केल्यानंतर प्रशासनाने सर्वच जिल्ह्यातील या भोजनाची तपासणी करणे आवश्यक आहे. कागदावर जास्त कामगार दाखवून प्रत्यक्षात कमी पुरवठा होत असल्याचा प्रकार देखील बीड सह इतर जिल्ह्यात सुरू आहे.
राज्याच्या कामगार मंत्रालयाच्या वतीने असंघटित कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली.यासाठी राज्य पातळीवर गुत्तेदार नेमण्यात आले.या गुत्तेदारांनी जिल्हा पातळीवर हे काम कमिशन वर वाटून दिले.बांधकाम कामगार,मोंढ्यातील हमाल यांच्यासह जे जे कामगार आहेत त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जेवण पुरवण्याचे हे काम कोट्यवधी रुपयांचे आहे.
कामगारांच्या भोजनात वापरले जाणारे गहू,तांदूळ,डाळी, तेल हे अत्यन्त निकृष्ट असल्याचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी हिंगोळीत उघडकीस आणले.अशीच परिस्थिती बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी,नांदेड,लातूर सह सर्वच राज्यात आहे.सडलेले, कुजलेले धान्य,भाजीपाला जेवणासाठी वापरला जातो.शासनाने ठरवून दिलेल्या मेन्यू प्रमाणे जेवण कधीच पुरवले जात नाही.
या सगळ्या कंत्राटामध्ये मोठ्या प्रमाणात झोलझाल आहे.त्यामुळे याची शासन स्तरावर चौकशी होऊन संबंधित पुरवठादार यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.