बीड-जल जीवन मिशन च्या दक्षता कक्ष प्रमुख पदावर तृतीय श्रेणी कर्मचाऱ्याची केलेली नियुक्ती ही सीईओ अजित पवार यांच्या आदेशानुसार झालेली आहे.नियुक्ती झालेली व्यक्ती पात्र आहे की नाही हे त्यांनाच विचारा,असे म्हणत जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी काकडे यांनी हात झटकले.
बीड जिल्हा परिषदेचा कारभार सध्या वादग्रस्त बनत चालला आहे.आरोग्य विभागातील सोनवणे नामक सेवकाची नियुक्ती नियमबाह्य झाल्याचे प्रकरण गाजत असताना आणखी एक नियुक्ती वादग्रस्त बनली आहे.न्यूज अँड व्युज ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली.
जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन कार्यालयात सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता पदावरील व्यक्तीची नियुक्ती करावयाची होती.मात्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी काकडे जे जल जीवन मिशन चे प्रकल्प संचालक आहेत त्यांनी सगळे नियम धाब्यावर बसवत तृतीय श्रेणी कर्मचारी असलेल्या नामदेव उबाळे यांची नियुक्ती केली.
ही नियुक्ती करताना जल जीवन मिशन चे जे नियम आहेत ते डावलून कारभार करण्यात आला आहे. याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी काकडे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेण्याचा प्रयत्न केला.त्यांनी कार्यालयाच्या आवरात उभे राहून या प्रकरणी तुम्हाला जी माहिती हवी आहे ती सीईओ ना विचारा अस सांगितले.
तृतीय श्रेणी कर्मचारी कसकाय नियुक्त केला या प्रश्नावर काकडे यांनी आपल्याला सीईओ नि आदेश दिले त्यानुसार आपण कारवाई केली.कोणाची पात्रता आहे की नाही हे आपल्याला माहीत नाही असे सांगितले.
बीड जिल्हा परिषद मध्ये आरोग्य विभागात यापूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गित्ते यांनी सोनवणे नामक उमेदवाराला सेवक पदी नियुक्ती दिली होती.ती सुद्धा वादग्रस्त आहे.असे असताना आता उबाळे सारख्या कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कारभार देणे कितीपत योग्य आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.या सगळ्याला उपमुख्य कार्यकारी अधिकारी काकडे हे जबाबदार असताना ते मात्र सगळं खापर सीईओ पवार यांच्या माथी मारून मोकळे झाले आहेत.आता पवार यावर काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे झाले आहे.