बीड- यावर्षी जोरदार पाऊस झाल्याने सोयाबीन आणि कापसाचे उत्पन्न मुबलक प्रमाणात येणार अशी चिन्हे आहेत,मात्र सोयाबीन आणि कापसावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.विशेषतः सोयाबीनवर पिवळ्या मोझाक चा अटॅक झाल्याने राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
महाराष्ट्रात ६९ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. त्यामध्ये कापसाच्या एकूण ३६.३८ लाख हेक्टरपैकी ३६ टक्के तर सोयाबीनची ३८.१४ लाख हेक्टर नियोजित क्षेत्रापैकी ३६.३ टक्के पेरणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण १५१.३३ लाख हेक्टरपैकी १०५.०३ लाख हेक्टरवर विविध पिकांची लागवड झाली आहे. महाराष्ट्रातील ३४ पैकी तब्बल २१ जिल्ह्यांत मॉन्सूनचा १०० टक्के पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी सोयाबीनची लागवड झाली. मात्र, पीक जोमात, उत्पादन कोमात अशी परिस्थिती झाली. त्यानंतर नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांनी पावसाळी सोयाबीनची लागवड केली आहे. मात्र, त्याच्यावर पिवळ्या मोझॅक या रोगाचा हल्ला झाला. यामुळे झाडाची पाने पिवळी होत आहेत. सोयाबीनच्या शेंगा भरत नाहीत. त्यामुळे हा हंगामही वाया जातोय की काय, अशा विवंचनेत सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत
कीटकनाशक उलटा नोझल वापरून पानाखालून फवारणी, शेतात पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर, नत्रयुक्त खतांचा संतुलित प्रमाणात वापर, आर्द्रता वाढल्यास बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकाची फवारणी अशा उपाययोजना शेतकऱ्यांना सांगितल्या.