परळी – क्रूरता आणि भयानकतेची परिसीमा गाठणारी घटना परळी शहरात उघडकीस आली आहे. दुसरी मुलगीच आहे म्हणून एका विवाहितेचा गर्भ अक्षरशः कापून काढण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.या प्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.या घटनेमुळे जिल्ह्यातील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे प्रकरण समोर आले आहे.
बीड जिल्ह्यात स्त्री भ्रूण हत्येचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असल्याने महाराष्ट्र हादरला होता.गेल्या तीन चार वर्षात हे प्रकार कमी झाल्याचे दिसत असतानाच मागील दोन महिन्यांपूर्वी बीड तालुक्यातील अवैध गर्भपात अन गर्भलिंग निदान चे प्रकरण समोर आले.यातील आरोपींवर गुन्हे दाखल झालेआहेत.
दरम्यान या पेक्षा भयानक अन माणुसकीला काळिमा फासणारी घटना परळी शहरात घडली आहे.शहरातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या सरस्वती नारायण वाघमोडे या विवाहितेला मागील वर्षी एक मुलगी झाली.त्यानंतर ती पुन्हा गर्भवती राहिली.यावेळी नवरा नारायण,सासू छाया वाघमोडे या दोघांनी गर्भलिंग निदान करण्याचा आग्रह केला.
सरस्वती ने याला विरोध केला तरीदेखील नवरा व सासूने डॉ स्वामी यांना घरी बोलावून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन द्वारे गर्भलिंग निदान केले.यावेळी मुलीचा गर्भ असल्याचे कळल्यानंतर अवैध गर्भपाताचे इंजेक्शन बळजबरीने देण्यात आले.
सरस्वती ला एक दीड तासाने त्रास होऊ लागल्यावर तिने ही घटना पुण्याला राहणाऱ्या भावाला कळवली. दरम्यान डॉ स्वामी यांनी अन्य एका सहकाऱ्याच्या मदतीने अक्षरशः सरस्वती च्या पोटातील गर्भ कापून काढत गर्भपात केला.हा सगळा प्रकार घडल्यानंतर भावासोबत माहेरी गेलेल्या सरस्वती ने पोलिसात फिर्याद दिली असून नवरा,सासू,डॉ स्वामी आणि अन्य एक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.