बीड- पावसाळ्यात नगर पालिका निवडणूक घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने असमर्थता दर्शवल्याने आता जिल्ह्यातील सहा नगर पालिकांच्या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील निवडणुका पुढील महिन्यात होतील अशी माहिती आहे.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेऊ नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.मात्र बीडचे जिल्हाधिकारी यांनी पावसाळ्यात बीड जिल्ह्यातील नगर परिषद निवडणूक घेण्याबाबत असमर्थता दर्शवली होती.
याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांनी निवडणूक आयोगाला पाठवले होते.त्यामुळे आयोगाने मराठवाड्यातील बीड वगळता इतर जिल्ह्यातील नगर परिषद निवडणूक घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे.ओबीसी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला असून यात बीडच्या नगर पालिकांचा उल्लेख नसल्याची माहिती आहे.
त्यामुळे आता जिल्ह्यातील बीड,गेवराई, माजलगाव, परळी,अंबाजोगाई आणि धारूर नगर पालिकेच्या निवडणुका ऑक्टोबर अथवा नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे.त्यामुळे भावी नगरसेवक होण्याची इच्छा असणाऱ्यांना तयारीसाठी भरपूर वेळ मिळणार आहे.