बीड- पावसाळा सुरू होऊन तब्बल दिड महिना उलटला तरीदेखील बीड जिल्ह्यात म्हणावा तसा समाधानकारक पाऊस झालेला नाही.दिवसभर आभाळ भरून येत मात्र भुरभुर पाऊस येत असल्याने जिल्ह्यातील तब्बल 144 तलाव अद्यापही कोरडेच आहेत.त्यामुळे पिकाचा प्रश्न मिटला असला तरी पिण्याच्या पाण्याची मात्र अद्याप सोय झालेली नाही हे निश्चित.
बीड जिल्ह्यामध्ये एकूण 144 लहान-मोठे प्रकल्प आहेत. मात्र, प्रत्येक प्रकल्पातील पाणीताळीत फरक राहिलेला आहे. जिल्ह्यात सर्वत्रच समप्रमाणात पाऊस झाला असे नाही तर अंबाजोगाई, परळी, केज या तालुक्यांवर वरुणराजाची कृपादृष्टी राहिली आहे तर उर्वरित जिल्ह्यामध्ये मात्र, रिमझिम असेच स्वरुप राहिलेले आहे. त्यामुळे केवळ खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळालेला आहे. जिल्ह्यात लहान आणि मोठे असे 144 प्रकल्प असून त्यातील 75 प्रकल्प आजही जोत्याखाली आहेत. पावसाने अंबाजोगाई आणि परळी तालुक्यातील सहा प्रकल्प 100% क्षमतेने भरले आहे.
बीड शहरालगत असलेल्या बिंदुसरा धरणातून शहराला पाणी पुरवठा केला जातो. शिवाय या धरणातील पाणीपातळी खालावली तर माजलगाव धरणातून पाणी पुरवठा होतो. गतवर्षी तुडूंब भरुन वाहणाऱ्या बिंदूसरा धरणात केवळ 37 टक्के पाणीसाठा आहे. धरण क्षेत्रात दमदार पाऊस झालेलाच नाही. त्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली नसून भविष्यात अपेक्षित पाऊस झाला तरच पाणीटंचाईचे संकट दूर होणार आहे. अन्यथा नागरिकांना पुन्हा एकदा कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे.
दरम्यान मराठवाड्यात काही जिल्ह्यात जास्तीचा पाऊस झाल्याने सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाला असून, 3 लाख 30 हजार 357 शेतकऱ्यांचे अंदाजे 3 लाख 20 हजार 879 हेक्टरचे नुकसान झाले आहे. तर 261 हेक्टर जमीन खरडून गेली आहे. हिंगोली जिल्ह्यात 19 हजार 197 शेतकऱ्यांचे 15 हजार 944 हेक्टरचे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यात1500 शेतकऱ्यांचे 1200 हेक्टर नुकसान झाले. जालना जिल्ह्यात 377 शेतकऱ्यांचे 50 हेक्टरचे नुकसान झाले असून, 205 हेक्टर खरडून गेली आहे.