परळी-सत्ता असो की नसो परळी मतदारसंघात विकास कोणी रोखू शकणार नाही,पाच वर्षांपूर्वी केंद्रात अन राज्यात सत्ता असणाऱ्यांनी परळीचा निधी रोखण्याचे काम केले अशी टीका करत माजीमंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला.हजारो वृक्षांची लागवड,आईचा आशीर्वाद, सुवासिनींनी केलेलं औक्षण आणि हजारो कार्यकर्त्यांकडून केलं गेलेलं भव्य स्वागत या माध्यमातून मुंडे यांचा वाढदिवस साजरा झाला.
2019 च्या निवडणुकीत मला जनतेने अभूतपूर्व प्रेम देऊन निवडून दिले, त्यांच्याच आशीर्वादाने मी मंत्री झालो. अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतर राज्यात सत्तांतर झाले असले तरी माझ्यासाठी सत्ता असणे किंवा नसणे हे कधीच महत्वाचे नाही. माझ्या पाठीशी असलेले सामान्य माणसाचे प्रेम व आशीर्वाद हीच माझी खरी शक्ती असून मी सदैव जनसेवेत राहण्यासाठी कटीबद्ध आहे, असे मत माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
आज परळी येथे धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. तत्पूर्वी धनंजय मुंडे यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई मुंडे यांनी परळी येथील त्यांच्या निवासस्थानी औक्षण करून तोंड गोड करत धनंजय मुंडे यांना आशीर्वाद दिले. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.

दुपारी शहरातील हालगे गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात राज्याच्या कानाकोपऱ्यातून धनंजय मुंडे प्रेमी कार्यकर्ते, समर्थक, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आदींनी धनंजय मुंडे यांना भेटून शुभेच्छा दिल्या.
आचार संहिता घोषित होण्यापूर्वी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळी राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी आपल्या दारी हे अभियान सुरू केले होते. आचार संहिता रद्द झाल्याने खंडित झालेले अभियान पुन्हा सुरू करून परळी शहर वासीयांना त्यांच्या घरी जाऊन भेटण्याचा उपक्रम पुन्हा सुरू करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी या कार्यक्रमात बोलताना घोषित केले आहे.
कोणत्याही अपेक्षेविना राज्यभरातून शेकडो किलोमीटर प्रवास करून आलेल्या असंख्य समर्थकांच्या गर्दीत धनंजय मुंडे यांनी जनतेचं प्रेम हीच आपली शक्ती असल्याचे म्हणत, शुभेच्छा व आशीर्वाद देणाऱ्या सर्वांच्या ऋणात राहून जनसेवेचे व्रत कायम जोपासणार असल्याचे आवर्जून नमूद केले. कार्यक्रमास महिलांचीही उपस्थीती लक्षणीय होती.