बीड- अमरनाथ यात्रे दरम्यान ढगफुटी झाल्याने शेकडो भाविक अडकून पडले आहेत.यामध्ये बीड जिल्ह्यातील धामणगाव येथील 38 भाविकांचा समावेश होता.मात्र हे सर्व भाविक सुखरूप असून 34 जण सुरक्षितस्थळी पोहचले आहेत तर 4 जणांना सुरक्षा कर्मचारी संपर्कात आहेत.ढगफुटी चा भीषण प्रसंग या सर्वांनी याची देही याची डोळा पाहिला अन अनुभवला आहे.
तब्बल दोन वर्षे कोरोनामुळे अमरनाथ यात्रा झाली नव्हती.या वर्षी यासाठी हजारो भाविकांनी तयारी केली होती.बीड जिल्ह्यातील सुद्धा शेकडो भाविकांनी यावर्षी अमरनाथ दर्शनाचा प्लॅन बनवला होता.
आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील तब्बल 38 जण या यात्रेसाठी आठ दिवसांपूर्वी रवाना झाले होते.या यात्रेदरम्यान शुक्रवारी सायंकाळ च्या सुमारास मोठी ढगफुटी झाली.त्यामुळे हजारो भाविक अडकून पडले.या भाविकांच्या सुटकेसाठी स्वतः केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू होते.
दरम्यान या यात्रेसाठी गेलेल्या धामणगाव येथील 38 यात्रेकरुपैकी 20 जण दुपारीच खाली आले होते तर 18 जण अडकून पडले होते.यातील 14 जणांना रात्री उशिरा सुरक्षित खाली सोडले तर उर्वरित 4 भविकांशी संपर्क झाला असून त्यांना देखील लवकरच सुरक्षित आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अमरनाथ यात्रेला गेलेल्या धामणगाव येथील भाविकांमध्ये विनायक पोकळे,दिनेश पोकळे,संदिप चौधरी,कैलास भिलारे,बाळासाहेब वांढरे,शिवाजी लोखंडे,भाऊसाहेब चौधरी,भाऊसाहेब पोकळे,संतोष मरकड,हिरामण झिंजूरके,अशोक बोराडे,सचिन चौधरी,ईश्वर पोकळे,महेश लोखंडे यांच्यासह दहा महिलांचा सहभाग आहे.हे सर्वजण सुखरूप आहेत.