जळगाव – कोरोनाच्या काळात कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर साहित्य खरेदी प्रकरणात जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन शल्य चिकित्सक डॉ नागोजी चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
बीड येथे 2017 साली अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक असलेले डॉ चव्हाण यांची बदली सीएस म्हणून जळगाव ला झाली होती.कोरोनाच्या काळात त्यांनी केलेल्या कार्याची दखल शासनाने देखील घेतली होती.मात्र याच काळात ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर,मॅमोग्राफी मशीन यासह इतर साहित्य खरेदीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलं होतं.
काही सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणात तक्रारी केल्या होत्या.जिल्हाधिकारी तसेच आरोग्य उपसंचालक नाशिक यांच्याकडून याची चौकशी करण्यात आली होती.
कोरोनाची आपत्ती असतांना विविध अत्यावश्यक उपकरणांच्या खरेदीत घोळ झाल्याचे आरोप आधीच करण्यात आले होते. जळगावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणी चौकशीसाठी आंदोलन देखील केले होते. या प्रकरणी काही दिवसांपूर्वीच जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक सुधाकर दगडू चोपडे, अभिलेखापाल मिलिंद निवृत्ती काळे व लेखा अधीक्षक हरिपाठ वाणी यांना नियमबाह्य व अवास्तव खरेदीला मंजुरी दिल्याप्रकरणी दोषी ठरवत निलंबित करण्यात आले होते. यानंतर याच प्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आलेली आहे.
आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये यांनी केलेल्या चौकशीत तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाबूलाल बालेला तर प्रभारी प्रशासकीय अधिकारी डॉ. सुनील बन्सी व प्रभारी प्रशासकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय डॉ. संदीप पाटील या चौघांवर ठपका ठेवण्यात आला असून त्यांना निलंबीत करण्यात आले आहे.