नांदेड – बीडचे तत्कालीन तहसीलदार तथा विद्यमान परभणीचे उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांना अखेर अटक झाली आहे.तब्बल दोन कोटींपेक्षा अधिकच्या धान्य घोटाळ्याप्रकरणी साडेतीन वर्षांपासून वेणीकर हे पोलीस आणि सीआयडी ला हुलकावणी देत होते.त्यांच्या अटकेने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
तब्बल साडे तीन वर्षे हुलकावणी दिल्यानंतर अखेर संतोष वेणीकर (Santosh Venikar) कोर्टासमोर हजर जाले. वेणीकर यांच्या या शरणागतीमुळे कृष्णूर घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 18 जुलै 2018 मध्ये तत्कालीन तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी कृष्णूर येथे सार्वजनिक वितरण प्रणालीचं धान्य घेऊन जाणारे 19 ट्रक पकडले त्यावेळी संतोष वेणीकर हे नांदेडचे जिल्हा पुरवठा अधिकारी होते. या प्रकरणाची व्याप्ती नांदेड, हिंगोली, परभणी, जालना या जिल्ह्यापर्यंत असल्याचे उघड झाले होते. तसेच या घोटाळ्याप्रकरणी तब्बल 19 जणांविरुद्ध दोषारोप पत्र सादर करण्यात आले होते. यातील कारवाईच्या भीतीने संतोष वेणीकर भूमीगत झाले होते. आज अखेर ते नायगाव कोर्टासमोर हजर झाले.
काय आहे नेमकं प्रकरण?
18 जुलै 2018 रोजी तत्कालीन पोलीस अधीक्ष चंद्रशेखर मीना आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी कृष्णूर येथे सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य घेऊन जाणारे 19 ट्रक पकडले होते. यात जवळपास 76 लाखांचा गहू तर 8 लाखांचे तांदूळ होते.कृष्णूर येथील इंडिया एग्रो मेगा अनाज कंपनीसमोर हे सर्व ट्रक पकडण्यात आले. या ट्रकमध्ये स्वस्त धान्य दुकानातून वितरीत केले जाणारे गहू, तांदूळ आदि धान्य होते. आधी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. परंतु प्रकरणाची व्याप्ती पाहून पोलीस अधीक्षक चंद्रशेखर मीना यांनी प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्याकडे दिला. नुरूल हसन यांनी या प्रकरणातील सर्व पुरावे जमा करून तब्बल 19 जणांविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले.
इंडिया मेगा कंपनीचे मालक अजय बाहेती, व्यवस्थापक जयप्रकाश तापडिया, वाहतूक कंत्राटदार पारसेवार, हिंगोलीचे कंत्राटदार ललित खुराणा यांना अटक झाली. नांदेड, हिंगोली, परभणी, जालन्यापर्यंत गुन्ह्याची व्याप्ती पसरलेली तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणाचा तपास नंतर गुप्तचर विभागाकडे देण्यात आला. या प्रकरणातील सर्व आरोपींना जामीन नाकारल्यानंतर त्यांची जवळपास एक वर्षे तुरुंगात रवानगी करण्यात आली. कोरोनाच्या लाटेनंतर सर्वजण जामीनावर सुटले होते.
कृष्णूर घोटाळ्यात कारवाईच्या भीतीने मुख्य आरोपी आणि तत्कालिन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर भूमीगत झाले होते. बिलोली आणि औरंगाबाद उच्च न्यायालयात त्यांनी जामानासाठी अर्जही सादर केले. तथापि न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला. दरम्यानच्या काळात शासनाने त्यांची नांदेडहून परभणी येथे बदली केली. तरीही समोर आले नाही. कोर्टाने वारंवार जामीन नाकारल्यानंतर संतोष वेणीकर यांनी साडेतीन वर्षानंतर कोर्टासमोर शरणागती पत्करली. कृष्णूर घोटाळ्यात संतोष वेणीकर यांची शरणागती हा या प्रकरणाचा मोठा भाग आहे. याचे कारण तीन वर्षापूर्वी या प्रकरणावरुन महसूल आणि पोलिस खात्यात चांगलाच संघर्षा पेटला होता. परंतु अखेर पोलिसांनी या प्रकरणातील सर्व पुरावे न्यायालयासमोर ठेवल्याने अखेर महसूल खात्याला माघार घ्यावी लागली.