बीड- मराठवाड्यावर वरूण राजाने तर अवकृपा केली आहेच पण बँकानी देखील वक्रदृष्टी दाखवली आहे.दहा हजार कोटी रुपयांचे टार्गेट असताना केवळ दोन हजार कोटी रुपये कर्जवाटप झाल्याने बळीराजा अडचणीत आला आहे.काही भागात तर दुबार पेरणीची वेळ येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सरकारने शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याची मागणी होत आहे.
मराठवाडा विभागात औरंगाबाद जिल्ह्यात 387.19 कोटी रुपये (28.58), लातूर जिल्ह्यात 254.87 कोटी रुपये ( 15.28 टक्के), उस्मानाबाद 363.96 कोटी (26.60 टक्के), बीड 359.03 कोटी (20.40 टक्के), नांदेड 435.25 कोटी ( 28.66 टक्के), जालना 259.70 कोटी (21.29 टक्के), परभणी 214.78 कोटी (19.43 टक्के), हिंगोली 143.71 (22.38 टक्के) एवढं कर्जवाटप करण्यात आले आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात काही भागात सुरवातीला दमदार पाऊस झाला. मात्र त्यांनतर पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. तर परभणी जिल्ह्यात अजूनही मान्सूनचा पाऊस दाखल झाला नाही. तर 1 जूनपासून आजपर्यंत 6.92 मिलिमीटर पाउस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली दमदार पाऊस झालाच तर पेरण्या करता येणार आहे.
औरंगाबादसह जालना आणि बीड जिल्ह्यात सुरवातीला दमदार पाऊस झाला होता. तर पावसाचे वातावरण सुद्धा निर्माण झाले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र आता पावसाने पाठ फिरवली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. जर अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येणार असल्याचे चित्र आहे.