मुंबई- कोरोनामुळे दोन वर्षापासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या मागील वर्षीच्या संचमान्यतेनुसार कराव्यात असे आदेश ग्रामविकास विभागाने काढले आहेत.तसेच न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या बदल्या न्यायालयाच्या आदेशानुसार कराव्यात असेही आदेशात म्हटले आहे.
2022 मध्ये होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या मागील वर्षीच्या (2020-21) संचमान्यतेनुसार कराव्यात, असे आदेश ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी मागील आठवडय़ात ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित (संकेतस्थळ) करण्यात आली आहे. या प्रणालीबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना माहिती देऊन संबंधित संकेतस्थळाला दररोज भेट देऊन संकेतस्थळावरील कार्यवाहीची मर्यादा कटाक्षाने पाळाव्यात. मागील वर्षीच्या संचमान्यतेच्या आधारे यंदाच्या शिक्षकांच्या बदल्या कराव्यात. कोरोनामुळे बऱ्याच जिल्हा परिषदांची बिंदुनामावली विभागीय आयुक्त, मागासगर्वीय कक्ष यांच्याकडून तपासणी झालेली नाही. त्यामुळे शासननिर्णयातील तरतुदीनुसार या वर्षीच्या आंतरजिल्हा बदल्या साखळी पद्धतीने कराव्यात किंवा विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्ष यांच्याकडून यापूर्वी तपासणी करून घेतल्यानुसार शिक्षकांच्या बदल्या कराव्यात, याबाबतचे निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर सोपवण्यात आले आहेत.
काही शिक्षकांच्या बदल्यांबाबत न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. या शिक्षकांची बदली एका शाळेतून दुसऱया शाळेत करताना न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आधी या शिक्षकांची ऑफलाइन बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत, तर काही शिक्षकांच्या बदलीबाबत न्यायालयाने विनंतीचा स्वीकार व्हावा, असे आदेश न्यायालयाने दिलेला असल्यास अशा शिक्षकांना ऑनलाइन बदली प्रक्रियेमध्ये भाग घेण्याबाबत लेखी कळवावे आणि व त्यांची पोहोच जपून ठेवावी.