बीड – तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सुरू होणाऱ्या शाळांमुळे विद्यार्थी अन पालक दोघेही आनंदात आहेत.मात्र यंदा सुरू होणाऱ्या शाळा या पालकांच्या खिशाला चाप लावणार आहेत.कागदाचे वाढलेले भाव यामुळे यंदाच्या वर्षी वह्या अन पुस्तकांचे भाव 25 टक्याने वाढले आहेत.
कोरोनानंतर देशातील कागद कंपन्यांकडील उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यांनी कागदाचे भावही वाढविल्याने वह्यांच्या किंमतीही वाढल्या असल्याचे सांगण्यात आले. ही वाढ मागील तीन महिन्यांत ४५ टक्क्यांपर्यंत येऊन पोहोचली आहे.
राज्यात वह्या आणि इतर कामकाजासाठी वेस्टकोस्ट, एनपीएल, बल्लारपूर पेपर आणि सेंच्युरी पेपर मिलच्या माध्यमातून वह्या आणि पुस्तकांसाठी कागदाचा पुरवठा केला जातो. दोन महिन्यांपूर्वी कागदाचा भाव ५५ हजार रुपये टन होता तो आता टनामागे ८५ हजार रुपयांवर गेले आहेत. पेपर मिलकडून एक हजार टन कागदाची मागणी करण्यात आली आहे. परंतु ३०० टन एवढाही कागद उपलब्ध होत नसल्याने बाजारात वह्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.
दीड महिन्यांपूर्वी ४८० ते ५५० रुपये प्रतिडझनने मिळणाऱ्या नामांकित कंपन्यांच्या वह्या आज ६५० ते ७०० रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. ए-फोर, लाँगबुकचे भावही ३०० ते ७०० रुपयांवर गेले आहेत. किरकोळ बाजारात वाढीव दराने या वस्तूंची विक्री होत आहे.