औरंगाबाद – पुढचे सात जन्मच काय ७ सेकंद सुद्धा अशी बायको नको,” अशा घोषणा देत औरंगाबादमध्ये पुरूषांनी पिंपळाच्या झाडाला उलट्या 108 प्रदक्षिणा घालून पिंपळाची पूजा केली. औरंगाबादमधील वाळूज परिसरात बायकोच्या रोजच्या कटकटीला कंटाळून तिच्या पासून सुटकारा मिळो म्हणून अनोखी पिंपळपौर्णिमा साजरी करण्यात आली आहे.
पिंपळपौर्णिमा साजरी करण्याविषयी पुरूषांनी सांगितले की, ‘आमचं नेमकं दु:ख असं आहे की, आम्ही सुखी संसाराची आशा ठेवून मोठ्या आनंदाने लग्न केलं आणि लग्न झाल्यानंतर बायकोने जे भांडणं सुरू केलय ते संपतच नाहीये.’
‘आमचं घरातल भांडणं जेव्हा पोलीस स्टेशनपर्यंत जातं, तेव्हा पोलीस देखील आम्हाला मदत करत नाही. त्यावेळी आम्ही समाजातून देखील बाहेर फेकलो जातो. पुढे न्यायव्यवस्थाही आमची मदत करत नाही. बायको एकतर आमच्याकडे नांदत नाही आणि नांदली तर ती सुखाने जगू देत नाही’. अशी व्यथा ही पुरूषांनी मांडली आहे. उद्या वटपौर्णिमा आहे, या वटपौर्णिमेच्या दिवशी बायका वटपौर्णिमेचे पूजा करून वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात. सती देवीची मनोभावे पूजा करतात आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात. मात्र, वटपौर्णिमीच्या आधल्या दिवशी पत्नीपीडित पतींनी पिंपळ पौर्णिमा साजरी करून अशी भांडखोर पत्नी कधीच नको, अशी पिंपळाला प्रार्थना केली.
पत्नी पीडित आश्रम आतापर्यंत आपण वृद्धाश्रम, अनाथ आश्रम पाहिले असतील. मात्र औरंगाबादच्या वाळूज भागात पत्नी पीडितांसाठीचा महाराष्ट्रातील पहिला आश्रम तयार करण्यात आले आहे. सहा पुरुषांनी एकत्र येत सुरुवातीला हा आश्रम सुरू केला होता. मात्र ही संख्या आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कायदे महिलांच्या बाजूने उभे आहे आणि समाजाची सहानभूती सुद्धा महिलांना मिळते. त्यामुळे काही वेळा पुरुषांची चूक नसतानाही नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे भरत फुले नावाच्या व्यक्तीने हा आश्रम सुरू केला आहे. दरवर्षी या आश्रमात पत्नीपीडित नवरोबांची पिंपळपौर्णिमा साजरी केली जाते.