बीड- राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याच जिल्ह्यात समाजकल्याण विभागात सावळागोंधळ सुरू असल्याचे उघड झाले आहे.जिल्ह्याचे समाजकल्याण अधिकारी डॉ सचिन मडावी यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई झाल्याने समाजकल्याण विभागात सगळं काही अलबेल नसल्याचं समोर आलं आहे.
बीड येथील सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त तथा समाजकल्याण अधिकारी डॉ सचिन मडावी यांच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी होत्या.याबाबत थेट समाजकल्याण आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल झाल्यानंतर चौकशी समिती स्थापन करण्यात आली.
औरंगाबाद येथील समाजकल्याण उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने मडावी यांच्यावरील दोषारोपांची चौकशी केली.यामध्ये त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली.त्यानंतर समाजकल्याण विभागाचे सहसचिव दि र डिंगळे यांनी मडावी यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याच जिल्ह्यातील समाजकल्याण अधिकारी यांच्यावर जर निलंबनासारखी कारवाई झाल्याने कामात कसूर करणाऱ्या आणि बेकायदेशीर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही हा संदेशच मुंडे यांनी दिला आहे.