बीड- मराठवाड्यात सर्वात मोठी असा गाजावाजा करून बांधलेली बीड जिल्हा परिषदेची नवीन इमारत पहिल्याच पावसात अक्षरशः बदाबदा गळाली.विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचा वित्त विभाग अन आणखी काही महत्वाच्या विभागातील कागदपत्रे या पावसामुळे भिजली असल्याची माहिती आहे.
बीड शहरातील शिवाजी चौकात पंकजा मुंडे यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेच्या नवीन इमारत बांधकामास मंजुरी मिळाली होती.जवळपास चार वर्षापेक्षा अधिक काळ हे बांधकाम रखडले होते.इमारत बांधकाम पूर्ण झाले तरी फर्निचर व इतरकाम प्रलंबित असल्याने ही इमारत दीड दोन वर्षे धूळखात पडून होती.
दरम्यान दोन अडीच महिन्यांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.बांधकाम,वित्त यासह काही विभागीय इमारतीत स्थलांतरित झाले आहेत.आणखी काहीविभाग लवकरच या ठिकाणी जातील.
जिल्ह्यात मान्सूनचा पहिला पाऊस बुधवारी सायंकाळी जोरदार बरसला.रात्री उशिरापर्यंत हा पाउस सुरूच होता.या पावसाने रस्त्यावर पाणी तर साचलेच पण जिल्हा परिषद नवीन इमारत देखील गळल्याचे दुसऱ्या दिवशी दिसून आले.वित्त विभागाला या पावसाचा मोठा फटका बसला.
पहिल्याच पावसात कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेली इमारत गळू लागल्याने या इमारतीचे लोकार्पण करण्यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट केले होते का,पहिल्या पावसात जर इमारत गळत असेल तर उद्या काही मोठी दुर्घटना झाली तर कोण जबाबदार असणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.