बीड – अवैध गर्भपातानंतर मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या प्रकरणात पोलीस तपास भरकटत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.गर्भलिंग निदान गेवराई ला झाले तर ते अंगणवाडी सेविकेने कसकाय केले?सिस्टर ने गर्भपात केला तर भुलतज्ञ कोण होता?गर्भपात घरी झाला तर महिलेच्या शरीरावर रुग्णालयातील पॉलिथिन अन चादरीचे तुकडे कसकाय होते असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.त्यामुळे पोलिसांनी चोर सोडून संन्याशाला फाशी तर दिली नाही ना अशी चर्चा होत आहे.
तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील बक्करवाडी येथे शितल गाडे या महिलेचा अवैध गर्भपातामुळे मृत्यू झाला होता. या प्रकरणात आज बुधवारी ५ आरोपीवर पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रविवारी (दि.५) रोजी बक्करवाडी (ता. बीड) येथील शितल गाडे ही 30 वर्षीय महिला दगावलेल्या अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. तिचा अवैध गर्भपात झाल्याचे समोर आल्यानंतर जिल्हयात खळबळ माजली होती. या प्रकरणात काल मंगळवारी मयत महिलेच्या पतीसह, सासरा, भाऊ आणि एजंट म्हणून काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकेला ताब्यात घेतले होते.
दरम्यान आज बुधवारी पहाटे या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक महादेव ढाकणे यांच्या फिर्यादीवरुन मयताचा पती गणेश गाडे, सासरा सुंदरराव गाडे, भाऊ नारायण निंबाळकर, यासह मध्यस्थ महिला मनिषा सानप आणि सिमा सिस्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांसह पीसीपीएनडीटी आणि एमटीपी कायद्यातील विविध कलमांखाली हा गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान या प्रकरणात गर्भलिंग निदान कोणी केले? गर्भपात करताना कोणकोण स्त्री रोग तज्ञ उपस्थित होते?भूल कोणी दिली? घरी गर्भपात केला तर त्यासाठी लागणारे मेडिकल साहित्य कोठून घेतले?बीडच्या ज्या डॉ किरण शिंदे यांच्याकडे प्रथमोपचार घेतले त्यांचा यात काय सहभाग आहे? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.पोलीस मात्र सर्व प्रकरणाचा पर्दाफाश केल्याचा दावा करून स्वतःची लाल करून घेत आहेत.