बीड – गेल्या दहा वर्षापेक्षा अधिक काळापासून बंद पडलेला गजानन सहकारी साखर कारखाना अखेर सुरू होणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सहकार्याने हा कारखाना यंदाच्या वर्षीच सुरू होणार आहे.कारखान्याचे चेअरमन रविंद्र क्षीरसागर यांनी पाहिलेलं स्वप्न अखेर मुलगा आ संदिप क्षीरसागर यांनी पूर्ण केलं आहे.
बीड,शिरूर, पाटोदा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्या काळात खा केशरकाकू क्षीरसागर यांनी नवगण राजुरी भागात गजानन सहकारी साखर कारखाना सुरू केला.या कारखान्याच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवण्याचा प्रयत्न केला गेला.
मात्र दहा बारा वर्षांपूर्वी शेतकऱ्यांसाठी संजीवनी असणारा हा कारखाना बंद पडला.शिखर बँकेचे थकलेले कोट्यवधी रुपयांचे कर्ज ह्यामुळे कारखाना अधिकच खोलात गेला.हा कारखाना पुन्हा सुरू व्हावा अशी इच्छा रवींद्र क्षीरसागर यांनी अनेकदा बोलून दाखवली होती.
स्व काकू आणि नाना यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हा कारखाना उभारला होता .मात्र तो नंतर बंद पडला.परंतु शरद पवार,अजित पवार, धनंजय मुंडे यांच्या सहकार्याने आपल्या वडिलांच स्वप्न पूर्ण होत आहे.बीड आणि शिरूर तालुक्यातील उसउत्पादक शेतकऱ्यांना आधार यामुळे मिळणार आहे.यंदाच्या वर्षीच गाळप सुरू होईल असा विश्वास आ संदिप क्षीरसागर यांनी न्यूज अँड व्युज शी बोलताना व्यक्त केला आहे.
दरम्यान अडीच वर्षांपूर्वी संदिप क्षीरसागर आमदार झाल्यापासून हा कारखाना सुरू व्हावा यासाठी ते प्रयत्नशील होते.अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून संदिप क्षीरसागर यांनी कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
राज्य शिखर बँकेच्या मंडळींना स्वतः शरद पवार,अजित पवार यांनी बोलून हमी घेतल्यानंतर हा कारखाना सुरू करण्यास एमएसी बँकेने परवानगी दिली आहे. या हंगामात कारखाना सुरू होऊन या भागातील शेतकऱ्यांना आधार होईल हे निश्चित.