बीड- अवैध गर्भपात झाल्यानंतर मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या प्रकरणात नातेवाईकासह गेवराई येथून एका महिला डॉक्टर ला ताब्यात घेण्यात आले आहे.अधिक तपास सुरू असून स्वतः जिल्हा शल्य चिकित्सक या सर्व प्रकरणात पोलिसांसोबत मोहिमेवर आहेत.
बीड जिल्हा रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी मृतावस्थेत एका महिलेला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.ज्यामध्ये या महिलेचा मृत्यू अति रक्तस्त्राव आणि गर्भपातामुळे झाल्याचे निष्पन्न झाले होते. शीतल गाडे या महिलेला तीन मुली होत्या,त्यानंतर ती गर्भवती होती.
तिचा खाजगी रुग्णालयात गर्भलिंग निदान करून गर्भपात करण्यात आल्याचे समोर आले होते. या प्रकरणात स्वतः शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन कारवाई साठी पुढाकार घेतला होता.
दरम्यान मंगळवारी सकाळी पोलिसांनी शीतल गाडे च्या पतीसह नातेवाईकांना चौकशी साठी ताब्यात घेतले.त्यानंतर गेवराई येथून एका महिला डॉक्टर ला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.या डॉक्टर च्या रुग्णालयात गर्भलिंग निदान झाले असल्याचा पोलिसांना संशय आहे.
बीड जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी सुरू असलेले गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे रॅकेट पुन्हा सक्रिय झाले असल्याचा संशय आहे.बीड,गेवराई, परळी या भागात आजही गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात केला जात असल्याचे या प्रकरणावरून सिद्ध झाले आहे.