बीड- बीड तालुक्यातील बक्करवाडी येथील गर्भवती महिलेच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे.खाजगी रुग्णालयात अवैध गर्भपात करताना शीतल चा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे.या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन कारवाई बाबत चर्चा केली आहे.त्यामुळे यात दोषी असणारे खाजगी डॉक्टर पोलिसांच्या रडारवर आहेत.
बीडच्या जिल्हा रुग्णालयात रविवारी दुपारी एका गर्भवती महिलेला दाखल केले.मात्र त्यावेळी ती मृत झालेली होती.त्यानंतर त्या महिलेच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले.स्वतः शल्य चिकित्सक डॉ साबळे यांनी या प्रकरणी लक्ष घातले आणि या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतला.
शवविच्छेदन अहवालात शीतल गाडे या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या महिलेचा गर्भपात खाजगी रुग्णालयात झाला असण्याची शक्यता आहे.महिलेच्या पोटातील गर्भ मिळून आला नाही मात्र तिच्या गर्भाशयाला मोठ्या प्रमाणावर जखमा आणि इजा झाल्याचे उघड झाले आहे.
याबाबत शल्य चिकित्सक डॉ साबळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सदरील महिलेचा मृत्यू का झाला याचे कारण समोर आले आहे.याबाबत आपण स्वतः पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे.या सगळ्या प्रकरणात जे खाजगी डॉक्टर आणि नातेवाईक दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.