बीड- युवा पर्व,झुकेगा नही, पुष्पा,डॉन असे दावे करत विकासाच्या गप्पा मारून शहर वासीयांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोन्ही क्षीरसागर यांच्या दुर्लक्षामुळे बीड मात्र उकांडा होत आहे.कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या एसी भाजी मंडई मध्ये सध्या कचरा साठवला जात आहे.त्यामुळे हा कोट्यवधींचा उकांडा बघण्यासाठी बीडकर गर्दी करत आहेत.
बीड नगर पालिकेत डॉ भारतभूषण क्षीरसागर आणि आ संदिप क्षीरसागर यांच्यातील हाडवैर सर्वश्रुत आहे.काका पुतण्याच्या वादाचा फटका शहरवासीयांना सहन करावा लागत आहे.शहरातील उखडलेले रस्ते असोत की बंद असलेले स्ट्रीट लाईट किंवा कित्येक वर्षात न काढलेल्या नाल्या असोत हे सगळे प्रश्न बीड शहरात आ वासून उभे आहेत.

क्षीरसागर काका पुतण्या मात्र आपलं उखळ पांढरे करून घेण्यात व्यस्त आहेत.डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी कोणत्यातरी योजनेच्या नावाखाली सिद्धिविनायक संकुल परिसरात रमेश सारडा या गुत्तेदाराला हाताशी धरून एसी भाजीमंडई या गोंडस नावाखाली कोट्यवधी रुपयांचे बांधकाम केले.
प्रत्यक्षात मात्र ही भाजी मंडई काही सुरूच झाली नाही.सुभाष रोड ते जिजामाता चौक,स्टेडियम या भागातील व्यापारी, नागरिक यांनी या एसी भाजीमंडई चा वापर लघुशंका करण्यासाठी सुरू केला.कोट्यवधी रुपयांच्या इमारतीची मुतारी झाल्याबद्दल अनेक पत्रकार,नागरिक यांनी आवाज उठवला,त्यानंतर नगर पालिकेने येथे साफसफाई केली.

मात्र गेल्या काही दिवसापासून नगर पालिकेच्या स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या चाऊस नावाच्या गुत्तेदाराने आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी या एसी भाजीमंडई च डंपिंग ग्राउंड केलं आहे.शहरातील कचरा या भागात आणून टाकला जात आहे.नगर पालिकेवर असलेल्या प्रशासकाचे देखील याकडे लक्ष नाहीये हे विशेष.