बीड- जिल्हाधिकारी अन गेवराई तहसीलदार, एस पी,डीवायएसपी या सगळ्यांनी मिळून गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांना निव्वळ वेड्यात काढले आहे.पवार यांनी उपोषण केल्यानंतर कारवाईच्या मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्या महसूल अन पोलिसांनी आठ दिवसात केवळ एक हायवा जप्त केला आहे.आजही वाळू घाटावरून जेसीबी,पोकलेन,केन्या अन बोटीने वाळू उपसा सुरू असून आमदार महोदयांच्या उपोषणाने वाळूचे रेट कमी झाले नसले तरी महसूल अन पोलिसांचे रेट मात्र वाढले आहेत.

बीड जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव करून प्रशासनाने महसूल वाढीसाठी प्रयत्न केले.मात्र वाळूचे ठेके ज्या लोकांनी घेतले त्यांच्या पाठीशी असलेल्या शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप च्या पुढाऱ्यांनी शासनाच्या डोळ्यात धूळफेक करत कोट्यवधी रुपयांची लूट चालवली आहे.

गेवराई तालुक्यातील वाळू माफियांबद्दल तहसीलदार सचिन खाडे यांना जेव्हा केव्हा फोन करा ते हतबल असल्यासारखं दाखवतात.मी एकटा काहीच करू शकत नाही,पुढारी धमक्या देतात,कारवाई सुरू आहे,महसूल चे लोक एका पैशाचे मिंदे नाहीत अशी उत्तरे ते देतात.त्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या कारवाईची अपेक्षा नाहीच आहे.

वाळू माफियांच्या विरोधात भाजपचे आ लक्ष्मण पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.हे उपोषण होऊ नये म्हणून वाळू माफियांनी महसुलमधील त्यांच्या लाईन मार्फत बरेच प्रयत्न केले.स्वतः जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी मी वाळू ठेकेदारांना तुम्हाला भेटायला पाठवतो ,त्यांची बैठक लावतो असे सांगून पाहिले.
मात्र आ पवार यांनी उपोषण केलेच.अखेर जिल्हाधिकारी यांनी कागदोपत्री पंकज कुमावत आणि तुषार ठोंबरे यांची समिती नियुक्त केली.शासकीय भावाने म्हणजे सहाशे रुपये ब्रास ने वाळू विक्रीचे आदेश दिले.पोकलेन,जेसीबी आढळून आल्यास कारवाईचे आदेश दिले.

हे सगळं लेखी दिल्यानंतर आ पवार यांनी प्रशासनावर विश्वास ठेवून उपोषण मागे घेतले.पण मुजोर अन पैशासाठी गोदापात्रात दुकान टाकून बसलेल्या महसूल अन पोलीस प्रशासनाने लेखी आश्वासनाकडे दुर्लक्ष केले.आजही म्हाळस पिंपळगाव, संगम जळगाव,गुंतेगाव,गंगावाडी,सावलेश्वर,कुरनपिंप्री,सावरगाव या ठिकणी जेसीबीने वाळू उपसा सुरू आहे.पोकलेन, केन्या अन बोटीने वाळू काढली जात आहे. ना जीपीएस आहे ना कोणी चेकिंग करत आहे.
याचाच अर्थ आमदार पवार यांच्या समोर कारवाईच्या बाता मारणाऱ्या प्रशासनाने आमदार पवार यांचे आंदोलन सिरीयस घेतलेच नाही,उलट हप्ते वाढवून घेण्यासाठी त्यांच्या नावाचा वापर केला जात आहे.