मुंबई – राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे तथा बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआय ने अटक केली आहे.डी एच एफ एल प्रकरणात ही अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.
येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएलमध्ये 3700 कोटी रुपये कर्जऱोख्यांतून गुंतवले होते. यात राणा यांना 600 कोटींची दलाली मिळाल्याचे समोर आले होते. त्यानंतर डीएचएफएलने हे पैसे छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुप, भोसले यांच्या इन्फ्रा लिमिटेड आणि बलवा आणि गोएंकाच्या कंपनीत वळते केले होते. त्यानंतर छाब्रियांना अटक करताच भोसले, बलवा आणि गोएंका यांच्यावर सीबीआयने छापेमारी केली होती. डीएचएफएल म्हणजेच दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने येस बँकेकडून 750 कोटींचे कर्ज घेतले होते. पण त्याचा वापरच करण्यात आला नाही, असे तपासात समोर आले होते.
अविनाश भोसले हे सुरूवातीला रिक्षाचालकाचे काम करायचे.भाड्याच्या घरात राहून त्यांनी भाड्याने रिक्षा देण्यास सुरूवात केली.त्यानंतर बांधकाम व्यवसायाशी संबंध आला आणि ते सरकारी कंत्राटदार बनले.हजारो कोटींच्या एबीआयएल ग्रुपचे भोसले हेच मालक आहेत.पुण्यात त्यांची रिअल इस्टेट किंग अशी ओळख आहे.
अविनाश भोसले हे फक्त व्यावसायिक नाहीत तर त्यांची राजकीय नेत्यांशी सोयरिकही आहे. कारण अविनाश भोसले हे मंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भोसले यांचेही संबंध चांगले असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे. दिवसभरात इकडे शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर ईडीचे धाडसत्र सुरू होते. अशात तिकडे अविनाश भोसले यांच्यावरही मोठी कारवाई झाल्याने केंद्रीय तपास यंत्रणांनीच आजचा दिवस चर्चेत राहिला आहे.