बीड – जिल्हा रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या गणेश बांगर या कर्मचाऱ्याला बहीण जयश्री बांगर यांच्या आशीर्वादाने कामावर न येताच फुकट वेतन दिल्याचे उघड झाले आहे.आरोग्य विभागाच्या चौकशी अहवालात ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात गणेश बांगर,जयश्री बांगर या दोन बहीण भावासोबत राजरतन जायभाये,अजिनाथ मुंडे,रियाज,ठाकर या कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात अक्षरशः धिंगाणा घातला.कोट्यवधी रुपयांची कंत्राटे स्वतःच्या फर्मला घेत वस्तूंचा पुरवठा न करताच बिले उचलून घेतली.
रक्तपेढी विभागात देखील मोठा गोंधळ घातला असल्याचे समोर आले.या सर्व प्रकरणाची चौकशी मुंबई आणि लातूरच्या पथकाने केली.त्यामध्ये रक्तपेढी विभागात डॉ जयश्री बांगर यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे समोर तर आलेच पण आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
गणेश बांगर हा रक्तपेढी विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होता.मात्र एकही दिवस नोकरीवर न येता त्याला पगार अदा करण्यात आली आहे.विशेष म्हणजे रक्तपेढी विभागाच्या प्रमुख असलेल्या बहिणीने भावावर एवढी माया तर दाखवलीच पण या भावाच्या एजन्सीच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा साहित्य खरेदी आणि पुरवठा देखील केला गेला.
गणेश बांगर याने जर नोकरीवर असताना काम केलंच नाही अन गैरहजर राहिला असेल तर त्याच्याकडून वेतनाचे पैसे वसूल करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची गरज आहे.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे हे ही कारवाई करण्याची हिंमत दाखवणार का हा खरा प्रश्न आहे.