बीड- जिल्हा रुग्णालयात रक्तपेढी सह पुरवठा विभागात मनमानी कारभार करणाऱ्या डॉ जयश्री बांगर यांच्यावरील दोष चौकशी अहवालात सिद्ध झाले आहेत.आरोग्य विभागाकडुन केलेल्या चौकशीत रक्तपेढी विभागात मोठ्या प्रमाणात वित्तीय अनियमितता झाल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे न्यूज अँड व्युज ने जिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराबाबत जो आवाज उठवला होता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे .आता डॉ बांगर यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे न्यूज अँड व्युज ने गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने उघडकीस आणले होते.जिल्हा शल्य चिकित्सक असो की लातूर चे उपसंचालक यांनी यावर फार काही कारवाई केली नाही.मात्र आमच्या बातम्यांची दखल अन सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठपुरावा यामुळे आरोग्य संचालनालय यांनी चौकशी समिती नेमली.
या समितीने केलेल्या चौकशीत रक्तपेढी विभागाच्या प्रमुख डॉ जयश्री बांगर या दोषी असल्याचे सिद्ध झाले आहे.व्यावसायिक नैतिकता न पाळणे,निष्काळजीपणा, कर्तव्यात कसूर,आर्थिक अनियमितता या गोष्टी आढळून आल्या आहेत.
गेल्या 2013 ते 2019 या काळात डॉ बांगर अँड कंपनीने रक्तदान करणाऱ्या लोकांच्या नावावरील अनुदान परस्पर हडप केल्याचे देखिल उघडकीस आले आहे.डॉ बांगर यांनी रक्तपेढी विभागाचा वापर आपल्या आर्थिक फायद्यासाठी केल्याचे अहवालात समोर आले आहे.
अशा पध्दतीने मनमानी कारभार करणाऱ्या डॉ जयश्री बांगर यांच्यावर आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.डॉ बांगर अन कंपनी वर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत न्यूज अँड व्युज चा पाठपुरावा सुरूच राहील हे नक्की.