बीड- गेवराई,माजलगाव, परळी,आष्टी,शिरूर या तालुक्यातून अधिकृत आणि अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या माफियांनी नदीपात्राचे वाटोळं केलं आहे.जेसीबी,पोकलेन,केन्या आणि बोटीने वाळू उपसा सुरू असताना महसूल आणि पोलीस प्रशासन मात्र कारवाई न करता बघ्याची भूमिका घेत आहे.कारण वाळू ठेकेदार हे पुढारी आहेत अन त्यांनी प्रशासनाच्या तोंडात पैशाचा बोळा कोंबला आहे,त्यामुळे कारवाई होण्याची शक्यता नाहीये.
बीड जिल्ह्यात सगळे अवैध धंदे सर्रास सुरू आहेत.विशेषतः वाळूच्या धंद्यात चांगले चांगले राजकीय पुढारी व्यस्त असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात सर्वाधिक वाळू ही गेवराई आणि माजलगाव तालुक्यात आहे.या तालुक्यातील युध्दाजित पंडित असो की विजयसिंह पंडित,अथवा बीडचे अनिल जगताप,राजेंद्र मस्के,सय्यद सलीम हे सगळेच वाळूच्या धंद्यात उतरले आहेत.यांच्यासोबत परीक्षित जाधव असो की मदन जगताप किंवा माजलगाव तालुक्यात जयसिंह सोळंके असो की जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव सर्वपक्षीय पुढारी या वाळूच्या धंद्यात आहेत.

राजकीय पुढाऱ्यांकडून नदीमध्ये सर्रास दरोडे घालण्याचा प्रकार सुरू असताना आम्ही कारवाई का होत नाही याबाबत काही अधिकाऱ्यांना विचारणा केली असता हे पुढारी खोट्या केस करतात,जीवे मारण्याचा प्रयत्न करतात असे सांगण्यात आले.मात्र महसूल आणि पोलिसांनी हप्तेखोरी बंद केली तर हे करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही याबाबत मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी देखील काहीच न बोलणे पसंत केले.

सत्ताधारी महाविकास आघाडीतील आमदार,जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, जिल्हा परिषद पदाधिकारी असे सगळेच या धंद्यात असल्याने महसूल आणि पोलीस प्रशासन कारवाई करण्याऐवजी आपल्या पदरात काय अन किती पडेल याकडे लक्ष देतात.त्यामुळेच तहसीलदार असो की उपविभागीय अधिकारी अथवा डीवायएसपी कोणीही वाळू घटावर प्रत्यक्ष जाऊन कारवाई करत नाहीत.
गेवराई तालुक्यातील संगम जळगाव,म्हाळस पिंपळगाव, सावरगाव,सावलेश्वर, बोरगाव थडी, गुंतेगाव यासह माजलगाव तालुक्यातील मंजरथ नंबर एक आणि दोन या ठिकाणाहून जेसीबी,पोकलेन सोबतच केन्या आणि बोटीने वाळू उपसा सुरू आहे.
एकाही वाळू ठेक्यावर ना तलाठी यत्न मंडळ अधिकारी, कोठेही सीसीटीव्ही लावण्यात आले नाहीत,एकाही वाहनावर जीपीएस बसवलेले नाही,सगळे नियम पायदळी तुडवून वाळू वाहतूक सुरू असताना जिल्हाधिकारी, एसपी,एएसपी, डीवायएसपी,पोलीस निरीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार हे सगळे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहेत.कारण महसूल आणि पोलिसांच्या डोळ्यावर सध्या वाळू माफियांनी पैशाची झापड लावलेली आहे.