बीड – जिल्ह्यासह मराठवाड्यातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर बनला असताना ऊस जाईल की नाही या चिंतेतून शेतकऱ्याने ऊस पेटवून देत आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
अतिरिक्त उसाचा प्रश्न पेटला असून जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा पहिला बळी गेला आहे. तोडणी ला आलेला ऊस कारखाना घेऊन जात नसल्याने, 30 वर्षीय तरुण शेतकऱ्याने चक्क ऊस पेटवून देत, ऊसातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलीय. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना, बीडच्या गेवराई तालुक्यातील हिंगणगावमध्ये घडली आहे. नामदेव आसाराम जाधव रा. हिंगणगाव ता. गेवराई जि. बीड असं गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.
नामदेव जाधव यांना एकूण 2 एकर शेती असून त्यांनी शेतामध्ये 265 जातीचा ऊस लागवड केला होता. त्यासाठी त्यांना एक लाख ते सव्वा लाख रुपये खर्च आला होता. मात्र हा ऊस आता तोडणीला येऊन देखील, परिसरातील एकही कारखाना तो ऊस घेऊन जात नव्हता, गेल्या अनेक दिवसांपासून ऊस घेऊन जाण्यासाठी, नामदेव जाधव हे कारखान्याकडे चकरा मारत होतो. मात्र त्यांना कारखान्याकडून निराशाच मिळाली, यामुळे नैराश्यात आलेल्या आसाराम जाधव यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यांनी ऊसाच्या फडाला पेटवून देत, फडातिलचं लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे.