बीड- बीड जिल्ह्यातील तलाठ्यापासून ते जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत अनेक अधिकारी अन कर्मचारी हे महसूल क्रीडा स्पर्धेत गुंतले आहेत,त्यामुळे रान मोकळे असलेल्या वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे. गेवराई सह अनेक तालुक्यात नियम धाब्यावर बसवून वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र आहे.
दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धा यावर्षी नांदेड येथे आयोजित केल्या आहेत.दोन वर्षे कोरोनामुळे स्पर्धा झाल्या नव्हत्या.त्यामुळे यावर्षी उत्साह आहे.या सर्धेसाठी सर्वच जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्यापासून ते शिपायापर्यंत अनेकजण रवाना झाले आहेत.
जिल्ह्यात तालुका अन जिल्हा पातळीवरील मोजकेच अधिकारी कर्मचारी हजर असल्याने वाळू माफियांचे चांगलेच साधले आहे.गेवराई,माजलगाव, आष्टी,परळी या तालुक्यातील जवळपास 12 ते 14 वाळू घाटंचा लिलाव झाला आहे.अनधिकृत वाळू उपसा देखील सुरू आहे.
या सगळ्या वाळू घाटा वरून जेसीबी,पोकलेन,केन्या अन बोटीच्या माध्यमातून बाळू उपसा सुरू आहे.जिल्ह्याच्या हद्दीत वाळू वाहतुकीला परवानगी असताना बीड जिल्ह्यातून अक्षरशः कोल्हापूर पर्यंत वाळू वाहतूक अन विक्री केली जात आहे.
वाळू उपसा करणारे सगळे लोक हे कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने अन पोलीस तसेच महसूल अधिकाऱ्यांना वाट्टेल तेवढे पैसे दिले जात असल्याने कारवाई होताना दिसून येत नाही.मात्र क्रीडा सर्धेच्या नावाखाली बाहेरगावी असलेल्या अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीचा फायदा घेत वाळू माफिया मोकाट झाल्याचे चित्र आहे.